सिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध!, काही चाकरमानी महालय आटोपूनच परतणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 03:46 PM2018-09-24T15:46:12+5:302018-09-24T15:54:49+5:30
गणेशोत्सवानंतर आता सिंधुदुर्गवासीयांना महालयाचे वेध लागले आहेत. अद्याप अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचा एक दिवस शिल्लक असला तरी महालयासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू झाली आहे. काही चाकरमानी गणेशोत्सव आटोपल्यानंतर मुंबईकडे परततील, तर काही जण महालय आटोपूनची मुंबईकडे जाणार आहेत.
सिंधुदुर्ग : गणेशोत्सवानंतर आता सिंधुदुर्गवासीयांना महालयाचे वेध लागले आहेत. महालयासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू झाली आहे. काही चाकरमानी मुंबईकडे परतले, तर काही जण महालय आटोपूनच मुंबईकडे जाणार आहेत.
गणेश चतुर्थी दिवशी गणरायांची विधिवत स्थापना केल्यानंतर दीड , पाच ,सात , नऊ, आणी अकरा दिवसांनी अनेक ठिकाणी गणरायाना निरोप देण्यात आला आहे, तर काही ठिकाणी सतरा, एकविस ,बेचाळीस दिवसांनीही गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे.
मात्र, सिंधुदुर्गात महालयांना विशेष महत्त्व असते. पितृ पंधरवड्यात आपल्या पितरांच्या नावे तिथीनुसार पिंडदान करुन पितरांच्या आत्मांना शांती मिळण्यासाठी धार्मिक विधी केले जातात. तर पितरांच्या नावाने नातेवाईक व ग्रामस्थांना महाप्रसाद वाढला जातो.
पितृपक्ष कालावधीत पितर धरतीवर येतात, त्यांना तृप्त केल्यास वर्षभर आपल्या कामांना गती मिळते अशी अनेक लोकांची श्रद्धा आहे. यावर्षी २६ सप्टेंबर पासून महालयाना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर आता लोकांना महालयाचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने तयारी सुरु झाली आहे.
गणेश दर्शनासाठी येणाऱ्या जवळच्या नातलगांना या महालयासाठी निमंत्रण दिले जात आहे. तसेच यासाठी सामानाची यादी बनवून ते खरेदी करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या विधीसाठी लागणाऱ्या वस्तूंची जुळवाजुळव करणे सुरू आहे.
पुरोहितांना निमंत्रण देणे तसेच महालयाशी संबंधित इतर अनेक कामांना सुरुवात करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी आपल्या मुळ गावी आलेले अनेक मुंबईकर महालय करुनच परतणार आहेत. त्यांची त्यादृष्टीने तयारी सुरू आहे