महामार्गावर आता ‘स्पीड गन’ची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 11:56 PM2017-08-08T23:56:13+5:302017-08-08T23:56:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्गनगरी : बेदरकारपणे वाहन चालविणाºया व नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर आता ‘स्पीड गन’ची नजर राहणार आहे. ही स्पीड लिमिट यंत्रणा महामार्ग पोलीस विभागाकडे उपलब्ध झाली असून, लवकरच महामार्गावर ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्याचप्रमाणे जे वाहनचालक वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळतील अशा चालकांचा वाहन परवाना रद्द करण्यात यावा याबाबतचा प्रस्तावही आरटीओकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक उमाकांत पालव यांनी दिली.
महामार्गावर वाहन चालविताना नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर वाढत्या अपघातांवर निश्चितच आळा बसविता येईल. नियम धुडकावून वाहन चालविणाºया वाहनचालकांवर आता स्पीड गन यंत्रणेची नजर राहणार आहे. महामार्गावर झाराप ते खारेपाटण दरम्यान ज्या ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र आहे आणि ज्या ठिकाणी वाहतूक वेग मर्यादा ताशी ४० ते ५० किलोमीटर वेग आहे अशाठिकाणी हे यंत्र बसविण्यात येणार आहे.
एखाद्या वाहनचालकाने नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. जर नियम तोडून चालक वाहनासहीत पळून गेल्यास स्पीड गन मशीनच्या साहाय्याने त्याच्या राहत्या घरी कारवाईबाबतची नोटीस बजावण्यात येणार आहे. ही अत्याधुनिक यंत्रणा कसाल येथील महामार्ग वाहतूक पोलीस विभागाकडे उपलब्ध झाली असून, लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती पालव यांनी दिली.
विशेष मोहिमेत दीड लाखाचा महसूल
मुंबई वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्गात महामार्गावर १२ ते २९ जुलैदरम्यान वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये बेदरकारपणे वाहन चालविणे, वाहनांवर टेल लाईट नसणे, रिफ्लेक्टर नसणे, काळ्या रंगाच्या काचा, सीट बेल्ट न वापरणे, हेल्मेटचा वापर नाही आदी १५४ वाहनचालकांवर वरील गुन्ह्यांमध्ये कारवाई करत दीड लाख रुपये महसूल गोळा केला आहे.