आता राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रयत्न करा

By admin | Published: March 18, 2017 11:02 PM2017-03-18T23:02:58+5:302017-03-18T23:02:58+5:30

शेखर सिंह : सिंधुुदुर्गनगरी येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आवाहन

Now try for a national award | आता राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रयत्न करा

आता राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रयत्न करा

Next

ओरोस : जिल्हास्तरावरील आदर्श अंगणवाडी कर्मचारी पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांनी आता राज्य व राष्ट्रीय स्तरावरील आदर्श अंगणवाडी कर्मचारी पुरस्कार मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी आदर्श अंगणवाडी कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळ््यात बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्यावतीने आयोजित आदर्श अंगणवाडी मुख्यसेविका व मदतनीस पुरस्कार वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह आणि महिला व बालविकास समिती सभापती रत्नप्रभा वळंजू यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, आरोग्य व शिक्षण समिती सभापती आत्माराम पालयेकर, जिल्हा परिषद सदस्या कल्पिता मुंज, रूक्मिणी कांदळगावकर, विभावरी खोत, सुगंधा दळवी, तालुक्यांचे सभापती, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, पुरस्कारप्राप्त अंगणवाडी कर्मचारी आदी उपस्थित होते.
शेखर सिंह म्हणाले, अंगणवाडी कर्मचारी या चांगले काम करीत असल्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात कुपोषणमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही चांगले काम केल्याबद्दल आज तुमचा सत्कार केला जात आहे. ज्यांना ज्यांना जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला आहे त्यांनी आता राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील आदर्श अंगणवाडी कर्मचारी पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगतानाच लोकसहभागातून अंगणवाड्या डिजिटल करतानाच अंगणवाडीला आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करा, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यानी यावेळी बोलताना केले.
यावेळी सोमनाथ रसाळ म्हणाले की, अंगणवाडी कर्मचारी या प्रत्येक गावातील लहान मुलांची काळजी घेतात. या विभागाच्या योजना, उपक्रम गावपातळीवर पोहोचवितात. गरोदर महिलांची विशेषत: त्यांचा आहार कसा असावा याची परिपूर्ण माहिती त्या देतात. अशाप्रकारे गावपातळीवर विशेष मेहनत घेणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कामाचे मूल्यांकन करून त्यांची आदर्श अंगणवाडी कर्मचारी पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आज पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे हा त्यांचा आनंदाचा क्षण आहे असे सांगतानाच यावर्षीपासून मिनी अंगणवाडी सेविकांनाही पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे रसाळ यांनी सांगितले.
रत्नप्रभा वळंजू म्हणाल्या, चांगल्या कामाची नेहमी पोचपावती मिळतेच. आज ती अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. त्यांचे सभापतींनी अभिनंदन केले. या विभागाचे विविध उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम या अंगणवाडी कर्मचारी करीत आहेत. अत्यंत अल्प मानधनात या अंगणवाडी कर्मचारी प्रामाणिकपणे या विभागाचे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी सहकार्य करीत आहेत. त्यांच्यामुळेच हा जिल्हा कुपोषणमुक्तीकडे आला आहे. त्याबद्दलही त्यांचे कौतुक करीत राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविलेल्या अंगणवाडी कर्मचारी शैलजा वळंजू यांचा आदर्श इतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेऊन चांगले काम करावे, असे आवाहन वळंजू यांनी केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, शिक्षण समिती सभापती आत्माराम पालयेकर, तसेच पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त
केले. (वार्ताहर)



१0९ जणांचा गौरव
जिल्ह्यातून तीन अंगणवाडी मुख्यसेविका, ४९ अंगणवाडी सेविका, ४९ मदतनीस तर ८ मिनी अंगणवाडी सेविका अशा एकूण १०९ कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व बचतपत्र असे स्वरूप असलेला आदर्श अंगणवाडी कर्मचारी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Now try for a national award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.