आॅनलाईन शॉपिंगवर आता शेणाच्या गोवऱ्या
By Admin | Published: November 21, 2015 10:55 PM2015-11-21T22:55:24+5:302015-11-21T23:57:15+5:30
ग्राहकांना भुरळ : अनेकांना रोजगाराची संधी, गिफ्ट पॅकमध्ये उपलब्ध
सिंधुदुर्गनगरी : आॅनलाईन कंपन्यांच्या साईटवर इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने, कपडे, खाद्यपदार्थ यासारख्या वस्तूंप्रमाणेच आता ग्रामीण भागात घराच्या अडगळीत पडून असणाऱ्या शेणाच्या गोवऱ्याही आॅनलाईन शॉपिंगवर विकत मिळत आहेत. खरे वाटत नाही ना? पण खात्री पटवायची असेल तर कोणत्याही आॅनलाईन कंपनीच्या साईटवर जावून फक्त ‘काऊडंग केक’ एवढेच टाईप करा. विविध सवलतीतील गोवऱ्या तुम्हाला मिळतील.
आॅनलाईन शॉपिंगकडे ग्राहकांचा वाढता कल असल्याने आॅनलाईन शॉपिंग आता नवे राहिलेले नाही. विविध माध्यमातून सवलतीच्या दरात वस्तू विकण्याचा प्रकार सुरु आहे. दुकानांपेक्षा स्वस्तात वस्तू मिळत असल्याने अनेकांची पसंती ही आॅनलाईन शॉपिंगवर पडत आहे. गृहोपयोगी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याकडे मध्यमवर्गीय ग्राहकांचा कल असतो. सणासुदीच्या काळात तर या आॅनलाईन शॉपिंगमध्ये सवलत दिली जाते. तसेच विविध प्रकारच्या आॅफर्स या काळात दिल्या जातात.
सर्वच ठिकाणी आॅनलाईन शॉपिंगवाल्यांनी आता अनेकांना भुरळ घातली आहे. मात्र, या साईटवर आता गोवऱ्याही विकत मिळतात असे कितीही कोणाला सांगितले तरी विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे.
पावसाळी व इतर हंगामांमध्ये चूल पेटवण्यासाठी वापर करता येईल. गोवऱ्यांचा होमहवनासाठीही वापर केला जातो. शेणाच्या गोवऱ्यांना तसे मूल्य नसते. कुणी दोन चार गोवऱ्या मागितल्यावर अशाच दिल्या जातात. परंतु त्याच गोवऱ्या आता पॅकींगमधून तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहेत. त्यासाठी केवळ कुठल्याही आॅनलाईन शॉपिंगच्या साईटवर जावून नोंदणी करावी लागणार आहे. फक्त एवढेच आहे की गोवऱ्यांच्या साईजप्रमाणे गोवऱ्यांची किंमत आकारली गेली आहे. साधारणत: २४ गोवऱ्यांची किंमत २८० रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे आता कितीही गोवऱ्या खरेदी करता येणार आहेत. ज्यांना मोजक्याच प्रमाणात गोवऱ्या लागतात त्यांना आता गोवऱ्या थापण्याची गरज नाही. तुमच्या घरीच शेणाच्या गोवऱ्या गिफ्ट पॅकमधून येतील. यातून गोवऱ्या थापणाऱ्यांना रोजगाराची संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे हे मात्र तेवढेच खरे आहे. (प्रतिनिधी)
आॅनलाईन खरेदीचा व्यापाऱ्यांना फटका
४आपल्या व्यवसायात नेहमी बिझी असणारी मंडळी खरेदीत वेळ वाया न घालवता तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करत काही गोष्टी आॅनलाईनच खरेदी करणे पसंत करत आहेत.
४उत्पादनाची विविधता, योग्य किंमती, सोयीनुसार खरेदी अशा अनेक कारणांमुळे अनेकजण आॅनलाईन शॉपिंगला पसंती देत आहेत. आॅनलाईन शॉपिंगचा विळखा वाढत चालला आहे.
४अगदी विद्युत उपकरणांपासून, धान्य, कपडे, दागिने, घड्याळ एवढेच नव्हे तर फराळ, रांगोळी आता शेणाच्या गोवऱ्या देखील साईटवर विकत मिळत आहेत.
४आॅनलाईन शॉपिंगकडे ग्राहकांचा कल वाढत जात असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठांवर होत असून लाखो कोट्यवधींची त्यांची उलाढाल यामुळे ठप्प होत आहे.
‘काऊडंग केक’
४‘काऊडंग केक’ अर्थात शेणाऱ्या गोवऱ्या! ग्रामीण भागात तसेच शहरी भागातही गोवऱ्यांचा विविध कारणांसाठी व वापरासाठी उपयोग केला जातो. ग्रामीण व शहरी भागामध्ये पावसाळी हंगाम संपल्यानंतर व भातशेती कापून झाल्यानंतर मळ्यामध्ये शेणाचा साठा करून एकाचवेळी २०० ते ४०० शेणाच्या गोवऱ्या थापल्या जातात. अशाप्रकारे गोवऱ्या थापण्याची प्रक्रिया मे अखेरपर्यंत केली जाते.