अब कौन बनेगा जिल्हाध्यक्ष?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2016 10:08 PM2016-04-17T22:08:43+5:302016-04-17T23:56:40+5:30
काँग्रेस : राणे, कीर प्रदेश कार्यकारिणीवर....
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. अन्य जिल्ह्यांचे अध्यक्ष निवडले गेले. परंतु, रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षपद निवडीचे घोंगडे भिजत पडले आहे. रमेश कीर यांनी सव्वा वर्षापूर्वी दिलेला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाने अजूनही स्वीकारलेला नाही. या पदावर माजी खासदार नीलेश राणे यांची निवड करण्याच्या कार्यकर्त्यांच्या मागणीकडे कानाडोळा करत त्यांची निवड प्रदेश कार्यकारिणीवर केल्याने कोण होणार कॉँग्रेसचा जिल्हाध्यक्ष? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कॉँग्रेस संघटनेची स्थिती दयनीय झाली आहे. रमेश कीर यांनी सव्वा वर्षापूर्वी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेश कॉँग्रेसकडे दिलेला आहे. मात्र, प्रदेशने अजूनही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. त्यांच्या राजिनाम्याबाबत कोणताही निर्णय प्रदेशस्तरावर झालेला नाही. जिल्हाध्यक्षपदावरून जिल्हा कॉँग्रेसमध्ये गेल्या दोन वर्षांच्या काळात मोठे राजकारण झाले, वादावादी झाली. रमेश कीर यांच्या विरोधात असलेल्या गटाने कीर यांना पदावरून हटविण्यासाठीही जोरदार प्रयत्न केले होते. पक्षश्रेष्ठींकडेही धाव घेतली होती. मात्र, पक्षाने कीर यांच्याकडेच पदाची जबाबदारी ठेवून त्यांची पाठराखण केल्याचे चित्र त्यावेळी समोर आले होते. गेल्या सव्वा वर्षापूर्वी जिल्हाध्यक्षपदावरून वादावादी अधिक तीव्र झाली. त्यामुळे रमेश कीर यांनी आपला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेश कॉँग्रेसकडे सादर केला. परंतु, सव्वा वर्ष होऊनही कीर यांच्या राजिनाम्यावर निर्णय झालेला नाही.
याच दरम्यान रत्नागिरीचे जिल्हाध्यक्षपद माजी खासदार नीलेश राणे यांना द्यावे, अशी आग्रही मागणी त्यांचे समर्थक गेल्या सहा महिन्यांपासून करत आहेत. राणे यांची निवड होणार, असे वातावरण त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाले होते. परंतु, दोन दिवसांपूर्वीच नीलेश राणे व रमेश कीर यांची पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर सचिवपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राणे यांना जिल्हाध्यक्षपद मिळणार नाही, असे संकेत पक्षाने दिले आहेत का? याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे.
नीलेश राणे हे धडाडीने कार्य करणारे आहेत, असे असताना त्यांच्या नावाचा जिल्हाध्यक्षपदासाठी विचार का झाला नाही, असा प्रश्न आता त्यांच्या समर्थकांनाही पडला आहे. (प्रतिनिधी)
निर्णय प्रलंबित? : नेतृत्व आहे कुठे?
रमेश कीर यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारलेला नसल्याने त्यांच्याकडे अजूनही जिल्हा कॉँग्रेस अध्यक्षपदाचा भार आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी नीलेश राणे समर्थकांनी आग्रह धरल्याने अन्य कोणीही या स्पर्धेत उतरले नव्हते. त्यामुळेच राणे यांची निवड होईल, असे मानले जात होते. रमेश कीर यांचा राजीनामा फेटाळला जाईल काय, याबाबतही चर्चा होती. परंतु, त्यांचा राजिनामाही फेटाळण्यात आलेला नाही. प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रमेश कीर व नीलेश राणे या दोघांनाही प्रदेश कार्यकारिणीवर घेतल्याने जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय प्रदेशला एवढ्यात घ्यावयाचा नाही, हेच दाखवून दिले आहे. जिल्हा कॉँग्रेसमध्ये नेत्यांची संख्याच अधिक झाल्याने गटबाजीही मोठ्या प्रमाणात आहे. या स्थितीत सर्व गटांना सांभाळून घेणारे नेतृत्व जिल्ह्यात आहे काय, असाही सवाल निर्माण झाला आहे.