सिंधुदुर्गातील तरुणाईला आता दीपोत्सवाचे वेध, जय्यत तयारी सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 01:45 PM2018-11-05T13:45:50+5:302018-11-05T13:47:44+5:30
गणेशोत्सवानंतर साजरा झालेल्या नवरात्रोत्सवाचा बहर ओसरल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लहान थोर व्यक्तिना आता दिपोत्सवाचे वेध लागले आहेत. या उत्सवासाठी तरुणाई सज्ज झाली असून विविध रंगांचे आकाश कंदील बनविण्याबरोबरच दिवाळीच्या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सध्या सुरु आहे.
सुधीर राणे
कणकवली : गणेशोत्सवानंतर साजरा झालेल्या नवरात्रोत्सवाचा बहर ओसरल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लहान थोर व्यक्तिना आता दिपोत्सवाचे वेध लागले आहेत. या उत्सवासाठी तरुणाई सज्ज झाली असून विविध रंगांचे आकाश कंदील बनविण्याबरोबरच दिवाळीच्या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सध्या सुरु आहे.
आश्विन कृष्ण पक्ष त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी , नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा असे चार दिवस साधारणतः दिवाळी साजरी केली जाते. काहीजण त्रयोदशी दिवाळीत न धरता उरलेल्या तिन दिवसांची दिवाळी असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात .म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो. पण वस्तुतः ते सण वेगवेगळे आहेत.असे काही जणांचे म्हणणे आहे.
दीवाळी मध्ये दिप म्हणजेच दिव्याना जास्त महत्व असते. त्यामुळे दिवाळीला दीपोत्सव असेही म्हटले जाते. या दिपोत्सवाची तयारी सुरु झाली आहे. बाजारपेठेमध्ये विविध रंगाचे तसेच विविध ढंगाचे आकाश कंदील विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. काही ठिकाणी घरांबरोबरच दुकानाना रंग काढण्यात येत आहे. बाजारपेठेत मातीच्या पणत्या ,रांगोळी , विजेवर चालणारी तोरणेही विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत.
अनेक ठिकाणी दिवाळीच्या फराळाची तयारी सुरु आहे. अलीकडे फराळ घरी बनविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे तयार फराळाला बाजारपेठेत जास्त मागणी असते. महिला बचत गटानी तयार फराळाच्या ऑर्डर स्विकारुन फराळ बनविला आहे.
दिवाळीच्या निमित्ताने सगळीकडे जरी उत्साहाचे वातावरण असले तरी वाढत्या महागाईमुळे खर्चाचा मेळ बसवीताना गृहिणीना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या उत्साहावर काहीसे विरजण पड़त आहे.
शहरी भागात दिवाळीच्या निमित्ताने काहीसा उत्साह दिसत असला तरी ग्रामीण भागात भात कापणी सुरु असल्याने शेतकरी त्यात गुंतले आहेत. नरकासुर स्पर्धेची तयारी काही तरुणांकडून केली जात आहे.काही तरुणानी नरकासुर बनवून तयार ठेवले आहेत. त्याची रंगरंगोटी सुरु आहे.
शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी असल्याने या सुट्टीचा वापर करीत त्यांच्याकडून अनेक 'फंडे ' केले जात आहेत. दीवाळी अंक, फराळ, नवीन कपड़े तसेच अन्य वस्तुंची खरेदी याविषयीही चर्चा सर्वत्र सध्या रंगत आहेत. विविध कंपन्यानी दुचाकी तसेच चार चाकी वाहनांवर ग्राहकाना आकर्षक सूट जाहिर केली आहे. त्यामुळे सर्वानाच दिपोत्सवाचे वेध लागल्याचे दिसून येत आहेत.