हानीचा आकडा तीन कोटींच्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2015 11:20 PM2015-06-29T23:20:51+5:302015-06-30T00:17:52+5:30
नैसर्गिक आपत्तीत दोघांचा मृत्यू : २४२ घरे, २५ गोठ्यांची पडझड, मदत मात्र तुटपुंजी
गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका महिन्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल ३ कोटी १५ लाख एवढ्या नुकसानीसह दोन व्यक्ती मृत झाल्याचे प्रशासनाकडे नोंद झाली आहे. नुकसानीमध्ये २४२ घरांची तर २५ गोठ्यांची पडझड झाली आहे. झालेल्या नुकसानीच्या तुलनेत १२ लाख ५ हजार रुपयांची मदत संंबंधितांना करण्यात आली आहे. नुकसानीचा आकडा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत खूप मोठा असल्याचे बोलले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमालीचा पाऊस पडतो. पावसाळी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी कोट्यवधीची नुकसानी होत असते. तसेच मनुष्यहानी देखील होते. शासकीय निकषात बसणाऱ्या नुकसानग्रस्तांना प्रशासनाकडून मदतही दिली जाते. या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे प्रशासनाला नेहमी सतर्क रहावे लागते. कधी कुठे काही आपत्ती उद्भवेल याचा काही नेम नसतो. ८ जूनपासून सिंधुदुर्गात मान्सूनला सुरुवात झाली. पेरणीयोग्य पुरेसा पाऊस सुरुवातीला पडला. नंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. या दरम्यानपर्यंत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शासकीय व खासगी मालमत्तेचे ५ ते ६ लाखांपर्यंत नुकसान झाले होते. त्यानंतर गेल्या आठवडाभरात पडलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत करून टाकले. यात घरांची पडझड, गोठ्यांचे नुकसान, वीज खांब उन्मळून पडणे, झाडे विद्युत तारांवर उन्मळून पडणे यामुळे अद्यापपर्यंत ३ कोटी १५ लाख ६ हजार रुपये नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाकडे प्राप्त आहे.
२४२ घरांची पडझड; ३ कोटी ३ लाख नुकसानी
जिल्ह्यात २४२ घरांची पडझड झाली असून त्याचे एकूण ३ कोटी ३ लाख ५० हजार ३०६ रुपये एवढे नुकसान झाले आहे. झालेल्या एकूण नुकसानीत घरांची पडझड होऊन झालेली नुकसानी ही जास्त आहे. वादळी वाऱ्यांचा फटका याला कारणीभूत असल्याचे बोलले जाते.
प्रथमच एवढी मोठी नुकसानी?
जूनच्या एका महिन्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीत तब्बल ३ कोटी १५ लाखांचे नुकसान झाले आहे. काही जाणकारांच्या मते गेल्या पाच ते सहा वर्षात एका महिन्यात एवढी मोठी नुकसानी आपण बघितली नसल्याचे त्यांनी सांगितले.
१२ लाख, ५ हजारांची नुकसान भरपाई
नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात ३ कोटी १५ लाख ६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या तुलनेत नुकसान भरपाई मात्र १२ लाख ५ हजार ३३ रुपये एवढी करण्यात आली आहे. यात वीज अंगावर पडून मृत्यू झालेल्या गावडे व वरक यांच्या नातेवाईकांना शासनामार्फत ५ लाख ५० हजार एवढी मदत देण्यात आली आहे. तर घराची पडझड झालेल्या ९५ जणांना २ लाख ५० हजार ८०३ रुपये तर गोठ्यांची पडझड झालेल्या १० जणांना २३ हजार रुपये अशी मदत देण्यात आली आहे. या दरम्यान २ जनावरे मृत झाल्याने त्यांच्या मालकांना ४० हजार रुपये एवढी मदत देण्यात आली आहे.