बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढतेच
By admin | Published: November 30, 2015 12:27 AM2015-11-30T00:27:49+5:302015-11-30T01:10:00+5:30
संगमेश्वर तालुका : आठ दिवसात चारजण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी
देवरुख : संगमेश्वर तालुका व परिसरातून बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. पोलिसांपुढेही हे एक आव्हान आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये एक शिक्षक, दोन विद्यार्थी आणि एक शिपाई बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या.या तक्रारींमध्ये कसबा हायस्कूलचे शिक्षक सईद पिरजादे आणि कडवई वसतिगृहातील विद्यार्थी सलमान बुड्ये हे दोघे बेपत्ता असल्याच्या तक्रारींपाठोपाठ अंत्रवली येथील एक विद्यार्थी ओंकार संतोष मोहिते आणि पैसाफंड इंग्लिश स्कूलचा शिपाई सीताराम जाधव असे एकूण चौघेजण बेपत्ता आहेत. यात वसतिगृहातील विद्यार्थी सलमान बुड्ये हा वसतिगृहात पुन्हा आल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांनी दिली आहे.
पहिल्यांदा शिक्षक सईद पिरजादे हे दि. २४ रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली. दि. २३ नोव्हेंबरपासून ते बेपत्ता आहेत. ते कोंडअसुर्डे (संगमेश्वर) येथील रहिवासी आहेत, तर कडवई वसतिगृहातील सलमान बुड्ये (१५) आणि ओंकार मोहिते (१६) हे दोघे दि. २६ रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तसेच मानसकोंडच्या फेपडेवाडीतील सीताराम गोपाळ जाधव (५३) हे देखील दि. २६ पासून बेपत्ता आहेत. ते सकाळी ५ वाजता चेंबूरहून गावी निघाले होते. मात्र, ते गावी न आल्याने शोधाशोध करण्यात आली. याबाबत त्यांच्या मुलीने चेंबूर (गोवंडी) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पिरजादे हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी १० वाजता घरातून आपल्या मोटारसायकलवरून कसबा शाळेत जातो, असे सांगून घराबाहेर पडले. शिक्षक पिरजादे हे दुपारी जेवणासाठी घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने शाळेत संपर्क साधला असता ते शाळेत आले नसल्याचे समजले. घाबरलेल्या पत्नी कौसर यांनी शेजाऱ्यांना ही घटना सांगितली. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. याबाबतचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोहर चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. (प्रतिनिधी)
रहस्य वाढले : पिरजादेंचे नातेवाईक धास्तावले
शाळेत जातो, असे पाच दिवसांपूर्वी सांगून बाहेर पडलेले आणि गूढरित्या बेपत्ता झालेल्या संगमेश्वरजवळच्या कसबा न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक सईद अब्दुल अजिज पिरजादे (४२) कोंडअसुर्डे यांचाही अद्याप शोध लागलेला नाही. सईद पिरजादे यांचा अजूनही शोध न लागल्याने त्यांचे नातेवाईक धास्तावले आहेत. मात्र, या प्रकरणातील रहस्य वाढतच असून, पिरजादेंना लवकरच शोधू, असा विश्वास संगमेश्वर पोलिसांनी व्यक्त केला आहे.
भीतीचे सावट
संगमेश्वर तालुक्यात बेपत्ता होणाच्या प्रकारात वाढ होत असल्याने तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध अद्याप न लागल्याने परिसरात भीतीचे सावट आहे.