सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदूची संख्या घटली
By admin | Published: August 30, 2015 12:26 AM2015-08-30T00:26:21+5:302015-08-30T00:28:51+5:30
मुस्लिमांच्या संख्येत वाढ : १४५२ जणांकडून कोणताही धर्म माहित नसल्याची नोंद
सिंधुदुर्गनगरी : सोमवारी घोषित करण्यात आलेल्या जनगणनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अहवालानुसार २००१ ते २०११ या दहा वर्षात हिंदूंची संख्या २२ हजार ११४ ने कमी होवून ती ७ लाख ८० हजार ३८४ एवढी आहे. तर मुस्लिमांच्या संख्येत २९९६ ने वाढ झाली असून ती २६ हजार २८४ एवढी आहे. बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख या अल्पसंख्याकांच्या वाढीच्या दृष्टीने काही शेकडो वाढ तर शेकडोने घट झालेली दिसून येते.
लोकसंख्येची आकडेवारी गोळा करताना जनगणना विभागाने ग्रामीण आणि शहरी असे वर्गीकरण केले आहे. या अहवालामध्ये १४५२ जणांनी आपला कोणताही धर्म नसल्याचे सांगितल्याची नोंद आहे तर ५३ जणांनी आपला धर्म कोणता आहे हे माहित नसल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्येसंबंधीची धर्मनिहाय आकडेवारी केंद्र शासनाने जाहीर केली आहे. ही आकडेवारी सन २०११ यावर्षी घेण्यात आलेल्या जनगणनेवर आधारीत आहे. २००१ च्या जनगणनेनुसार त्यावेळी सिंधुदुर्गात हिंदूंची संख्या ८ लाख २४९८ होती. २०११ पर्यंत त्यात २२ हजार ११४ ने घट होवून ती ७ लाख ८० हजार ३८४ झाली. मुस्लिमांची संख्या २००१ मध्ये २३ हजार ६६८ होती. २०११ मध्ये त्यात २९९६ ने भर पडत ती २६ हजार २६४ झाली आहे. २००१ च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्याही ८ लाख ६८ हजार ८२५ एवढी होती. या लोकसंख्येतील हिंदूंची संख्या ८ लाख २ हजार ४९८ एवढी होती. तर मुस्लीम धर्मीयांची संख्या २३ हजार ६६८ एवढी होती. सन २०११ ची जनगणना जाहीर झाली तेव्हा त्यात मुळात सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या ही तब्बल १९ हजार १७४ लोकसंख्येने घटली व ती आता ८ लाख ४९ हजार ६५१ एवढी आहे. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्गची लोकसंख्या साडेआठ लाख
२००१ च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ लाख ६८ हजार ८२५ एवढी लोकसंख्या होती. मात्र, २०११ च्या जनगणनेनुसार त्यात १९ हजार १७४ ची घट होती ती आता ८ लाख ४९ हजार ६५१ एवढी निश्चित झाली आहे. यात ४ लाख १७ हजार ३३२ पुरुष तर ४ लाख ३२ हजार ३१९ स्त्रीयांचे प्रमाण आहे.