फलोत्पादनासाठी पोषक हवामान : आरीफ शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2016 09:39 PM2016-06-07T21:39:07+5:302016-06-08T00:12:49+5:30

शेतकऱ्यांनी ओलसर जमिनीत दुसरे पीक घेण्याचे नियोजन करण्याची गरज - थेट संवाद

Nutrient weather for horticulture: Araf Shah | फलोत्पादनासाठी पोषक हवामान : आरीफ शहा

फलोत्पादनासाठी पोषक हवामान : आरीफ शहा

Next



जिल्ह्यातील हवामान फलोत्पादनास पोषक आहे. त्याला अनुसरून केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना गेली दहा वर्षे राबविण्यात येत आहे. कार्यक्रम अंमलबजावणीअंतर्गत आलेले अनुभव व अडचणी विचारात घेऊन योजनेच्या काही घटकांमध्ये वाढ करून मापदंडामध्ये बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यात सरासरी चार हजार मिलिमीटर पाऊस पडतो. उपलब्ध पर्जन्यमानावर खरीप व रब्बी हंगामात पिके घेण्यात येतात. खरीप हंगामातील भात, नागली, कडधान्य, गळीत धान्य, इतर तृणधान्यअंतर्गत एकूण ८३ हजार ६६.७ हेक्टर, तर आंबा, काजू, नारळ, सुपारी, चिकू व इतर पिकांतर्गत १ लाख ६३ हजार ११६ हेक्टर क्षेत्र आहे. शासकीय विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. बांधावरील तूर लागवड, ग्राम बिजोत्पादन, सेंद्रीय शेती प्रकल्प आदी महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत, याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक आरीफ शहा यांच्याशी ‘लोकमत’ने साधला थेट संवाद.

प्रश्न : खरीप हंगामातील महत्त्वपूर्ण उपक्रम कोणता ?
उत्तर : जिल्ह्यात पेरण्या सुरू झाल्या आहेत. विद्यापीठ मान्यताप्राप्त चारसूत्री व सगुणा लागवड पध्दतीचा अवलंब शेतकरी करू लागले आहेत. परंतु यावर्षी बांधावर तूर लागवड हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तूर द्वीदल वर्गीय कडधान्य आहे. पालापाचोळा भातशेतीला सेंद्रीय खतासाठी, तर नत्र वाढीस पोषणासाठी उपयुक्त आहे, शिवाय तुरीच्या उत्पादनातही वाढ होणार आहे. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
प्रश्न : शेतीकडून लोक बागायतीकडे वळत आहेत का?
उत्तर : शेतीकडून बागायतीकडे लोक वळलेले नाहीत. उलट पडिक क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात येत आहे. मक्त्याने शेती करावयास देणे बंद करण्यात आल्याने भात, नाचणीचे क्षेत्र ओसाड पडले आहे, ही धोक्याची घंटा आहे. उत्पादन, उत्पादकता वाढली आहे. त्यामुळे एकूण पिकावर परिणाम झाला आहे. यावर्षी पाऊस अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ओलसर जमिनीत दुसरे पीक घेण्यासाठी नियोजन करावे.
प्रश्न : ‘ग्राम बिजोत्पादन’ तयार करण्यामागील उद्देश्य?
उत्तर : शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात ‘ग्राम बिजोत्पादन’ तयार केले जाणार आहे. ग्राम बिजोत्पादनासाठी जिल्ह्यातील ५०० हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुकानिहाय एक ते दोन गावातून ५० ते ६० हेक्टर क्षेत्राची निवड केली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातील एक ते दोन गावांची त्यासाठी निवड केली जाणार आहे.
पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे निकृष्ट असल्यास रोपे उगवत नाहीत. त्यामुळे कृषी विभागाने ग्राम बिजोत्पादन क्षेत्र तयार करण्याचा निर्धार केला आहे. शेतकऱ्यांना खात्रीशीर बियाणे उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.
प्रश्न : सेंद्रीय शेतीकडे शेतकरी वळत आहेत का?
उत्तर : केंद्र शासनाने सेंद्रीय शेतीस प्राधान्य दिले आहे. त्यानुसार भारतातील सर्वात चांगले मॉडेल रत्नागिरीत तयार करण्यात येणार आहे. येथील शेतकऱ्यांना कमीत कमी पाण्यात अधिकतम पिके घेण्याबरोबर पिकाची उत्पादकता वाढवण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पन्नास एकर शेतीचा एक गट याप्रमाणे जिल्ह्यात एकूण २८ गट तयार करण्यात येणार आहेत. खते, कीटकनाशके तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रश्न : यांत्रिकीकरण वाढते आहे का?
उत्तर : शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या मान्यतेने अनुदानावर यांत्रिक अवजारे वितरीत करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांकडून त्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. पॉवर टिलर, राईस मिल मागणीनुसार उपलब्ध करून दिली जाणार आहे. शासनाच्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
प्रश्न : फळबाग लागवड वाढत आहे का?
उत्तर : फळबाग लागवडीसाठी रोजगार हमी योजनेंतर्गत १००६ हेक्टर क्षेत्र इतके जिल्ह्याचे उद्दिष्ट आहे. मनरेगासाठी लक्षांक नाही परंतु लक्षांक वाढवण्यात येणार आहे. मनरेगासाठी महसूल विभागाकडे विनंती करून सातबाराच्या जाचक अटीमध्ये शिथिलता आणण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे, जेणेकरून लागवड वाढवण्यास मदत होईल.
प्रश्न : पीक पध्दतीत कोणता बदल अपेक्षित आहे?
उत्तर : शेतकरी पारंपरिक पध्दतीने एकेरी पिके घेत आहेत. भाताच्या बांधावर तूर लागवड, आंबा बागेत शेवगा, दालचिनी, काळीमिरी यांसारखी दुय्यम पिके घेण्यात यावी. शेवगा पिकामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण सुधारते. शेवग्याच्या हिरवळीमुळे खत उपलब्ध होते. मिळणाऱ्या शेंगांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुय्यम पिकांकडे वळणे गरजेचे आहे.
- मेहरून नाकाडे

1 सेंद्रीय शेती प्रकल्पात भात, नागली, मसाला पिके तसेच नगदी पिकांमध्ये आंबा, काजू व भाजीपाला लागवडीची माहिती देऊन शेतकऱ्यांना संबंधित माल विकल्यावर बाजारभावापेक्षा अधिक पैसे मिळवून देण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. मात्र, शेतकऱ्यांना सेंद्रीय खतेवगळता अन्य खते वापरता येणार नाहीत.


2कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेले कृषी महाबीजचे बियाणे शेतकऱ्यांना वितरीत केले आहे. सुधारित वाणाचे १७ टन भात बियाणे शेतकऱ्यांना विकण्यात येणार आहे. उत्पादनानंतर शेतकऱ्यांकडून पुन्हा तेच भात विकत घेतले जाईल. उत्पादकता वाढविणे ‘ग्राम बीजोत्पादन’चा उद्देश आहे.

3एकेरी पीक पध्दतीमध्ये बदल करून शेतकऱ्यांनी दुहेरी अथवा अंतर्गत अन्य पिके घेण्याकडे वळले पाहिजे. अन्य पिकांच्या पालापाचोळ्यामुळे जमिनीचा पोत व्यवस्थित राहून पीक उत्तम येऊन आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

Web Title: Nutrient weather for horticulture: Araf Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.