पोषण आहारास मालवणात विरोध
By admin | Published: July 6, 2014 11:08 PM2014-07-06T23:08:46+5:302014-07-06T23:18:25+5:30
महिला बचतगटांनी नगराध्यक्षांची घेतली भेट
मालवण : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत नागरी भागात पोषण आहार पुरवठा करण्यासाठी स्वारस्याच्या अभिव्यक्ती प्रक्रियेस मालवण शहरातील महिला बचतगटांनी विरोध दर्शविला आहे. शहरातील शाळांमध्ये पोषण आहार पुरविण्याचे काम करणाऱ्या बचतगटांच्या महिला प्रतिनिधींनी शनिवारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची भेट घेऊन अभिव्यक्ती प्रक्रियेस विरोध दर्शविण्यासाठी पाठिंब्याची मागणी केली.
शिक्षण विभागास प्राप्त झालेल्या परिपत्रकात म्हटले आहे, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्वारस्याच्या अभिव्यक्ती प्रक्रियेतून निवड करण्यात आलेल्या केंद्रीय स्वयंपाकगृहातून सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षामध्ये आहार पुरवठा सुरु होणे अपेक्षित आहे.
या केंद्रीय स्वयंपाकगृहातून आहार पुरवठा सुरु होईपर्यंत सध्याच्या कार्यपद्धतीनुसार कार्यरत यंत्रणेमार्फत पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात आहार पुरवठा करून घेण्याची कार्यवाही करावी. त्यासाठी जुन्या करारनाम्यात मुदतवाढ देताना पुढील आदेश होईपर्यंत फक्त तात्पुरत्या स्वरूपात आहार पुरवठा करण्याबाबतची तरतूद करण्यात यावी.
दरम्यान, मालवण गटशिक्षण कार्यालयाने स्वारस्याच्या अभिव्यक्तीचे अर्ज मागविले होते. ही यंत्रणा नियुक्तीबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात आल्याचे पत्र केंद्रप्रमुखांना पाठविले आहे. त्यामुळे शहरातील शाळांना पोषण आहार पुरविणाऱ्या महिला बचतगटांमध्ये खळबळ उडाली आहे. शनिवारी प्रियांका सामंत, अपर्णा देसाई, शुभदा परब, प्रिती साटेलकर, शिवाजी पारकर, सुवर्णा गावडे, श्रद्धा तळवडेकर, प्रमिला मयेकर आदींच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांची भेट घेऊन हा आदेश महिला बचतगटांवर अन्यायकारक असल्याचे सांगितले.
लोकप्रतिनिधींनी आम्हांला आता पाठिंबा द्यावा. गेली १४ वर्षे आम्ही शाळांना पोषण आहार पुरविण्याचे काम करतो आहोत. पोषण आहाराची जबाबदारी बचत गटांकडेच राहवी. सन २००३ पासून ५० पैसे दरावर आम्ही हे काम करतोय. महिला बचतगटांवरचा अन्याय दूर झालाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. पंचायत समितीशी संपर्क साधला असता शासनाकडूनच हे आदेश प्राप्त आहेत. केंद्रीय स्वयंपाकगृहात पोषण आहार शिजविल्यानंतर त्याचे वितरण होणार आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)