भूसंपादनाबाबत आक्षेप; विकासाला विरोध नाही

By admin | Published: May 19, 2015 10:20 PM2015-05-19T22:20:31+5:302015-05-20T00:14:42+5:30

नीतेश राणे : महामार्ग चौपदरीकरणात प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे

Objection to land acquisition; There is no resistance to development | भूसंपादनाबाबत आक्षेप; विकासाला विरोध नाही

भूसंपादनाबाबत आक्षेप; विकासाला विरोध नाही

Next

कणकवली : माझ्यासह कणकवली मतदारसंघातील कोणत्याही ग्रामस्थाचा विकासाला विरोध नाही आहे. मात्र, प्रशासनाकडून सध्या महामार्ग चौपदरीकरणाबाबत सुरू असलेल्या भूसंपादनाला आमचा आक्षेप आहे. प्रशासन ग्रामस्थांना अंधारात ठेऊन राबवित असलेल्या भूसंपादनाला आमचा कडाडून विरोध असून असे भूसंपादन कदापी होवू देणार नाही, असा सज्जड दम आमदार नीतेश राणे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंगळवारी भरला. दरम्यान, युती शासनाच्या सहा महिन्यांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्व स्तरातून विकास पूर्णपणे ठप्प झाला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नीतेश राणे म्हणाले, प्रशासन राबवित असलेल्या भूसंपादनाला आमचा आक्षेप आहे. प्रशासन लोकांना अंधारात का ठेवत आहे ? सर्व लोकांना बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून आपण राबवित असलेल्या मोजणी प्रक्रियेबाबत माहिती का देत नाही ? ग्रामस्थांना धमकावून, खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत ही काय हुकूमशाही आहे की काय ? प्रशासकीय अधिकारी चोरासारखे मोजणी करायला फिरत आहेत. काही ठिकाणी सकाळी ६ वाजता, रात्री अपरात्री कशाची मोजणी करता? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
युती शासनाच्या गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामे पूर्णपणे ठप्प आहेत. वाळू, मच्छिमारी, महसूलचे तलाठ्यांचे आंदोलन, भात गोडावनात सडत असलेला भातसाठा अशा अनेक प्रश्नांवर येथील शासनकर्त्यांकडे उत्तरेच नाहीत. आंबा बागायतदार, शेतकरी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे त्रस्त आहे. मात्र, याला कोणत्याही प्रकारची मदत शासनाकडून जाहीर झालेली नाही. त्यातूनच देवगड येथील एका बागायतदाराने मागील आठवड्यात आत्महत्यादेखील केली आहे. असे सर्व घडत पालकमंत्री मात्र बिअरबारच्या उद्घाटनांना हजेरी लावत आहेत. त्यामुळे येथील जनतेने न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालकमंत्री कोणतीही ठोस भूमिका घेत नाही, प्रशासनावर त्यांचा कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. परिणामी जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. युती शासनाच्या पाच वर्षांच्या कालावधीपैकी अवघ्या सहा महिन्यातच जनता कंटाळली असून त्यावेळी आपण चूक केली काय? असा प्रश्न आपआपसात विचारताना आढळत आहे. (प्रतिनिधी)


२३ पासून प्रत्येक गावाला भेट देणार
महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत आपण २३ मे पासून भूसंपादन होणाऱ्या प्रत्येक गावात भेट देणार असून तेथील लोकांच्या समस्या जाणून घेणार आहे. त्यानंतर या सर्व गावभेटीतून एक आवाज बनवून प्रशासनासमोर आपले म्हणणे मांडणार आहे. सध्या लोकांना विश्वासात न घेता छुप्या पद्धतीने सुरू असलेले भूसंपादन बंद पाडण्यात आले आहे. त्याबाबत आपण प्रांताधिकाऱ्यांशी चर्चादेखील केली आहे. मात्र, यानंतर ग्रामस्थांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जोपर्र्यत प्रशासन देत नाही. तोपर्यंत कोणतेही काम सुरू करायला देणार नाही, असा दम नीतेश राणे यांनी भरला.



प्रशासनाने महामार्गाच्या भूसंपादनाबाबत ग्रामस्थांना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम तयार कराव्यात. पारदर्शकपणे प्रक्रिया राबवावी. प्रत्येकाच्या मनात असलेल्या भूसंपादनाबाबतच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. शंकांचे निरसन करावे. तर आणि तरच आपण लोकांना घेऊन प्रशासनाला योग्य ते सहकार्य करण्यास तयार आहे.
- नीतेश राणे, आमदार, कणकवली मतदारसंघ

तलाठ्यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यात मार्ग काढायचा सोडून प्रशासन ताठर भूमिका घेऊन आपले ते खरे करत आहे. या आंदोलनामुळे महसूलची गावागावातील सर्व कामे ठप्प आहेत. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Objection to land acquisition; There is no resistance to development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.