महाशिवरात्री निमित्त 'कनक रायडर्स' शिवशँभोचरणी लीन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 06:53 PM2021-03-11T18:53:14+5:302021-03-11T18:56:13+5:30
Mahashivratri Cycling sindhuddurg- महाशिवरात्रीनिमित्त कणकवली शहरातील 'कनक रायडर्स ' च्या सायकलपटूंनी १०४ किलोमीटर नाईट सायकल रायडिंग करून अनोख्या पद्धतीने शिवशंभोचरणी आपली श्रद्धा अर्पण केली.
कणकवली : महाशिवरात्रीनिमित्तकणकवली शहरातील 'कनक रायडर्स ' च्या सायकलपटूंनी १०४ किलोमीटर नाईट सायकल रायडिंग करून अनोख्या पद्धतीने शिवशंभोचरणी आपली श्रद्धा अर्पण केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक सायकल रायडिंग कार्यक्रमात कणकवली शहरातील 'कनक रायडर्स 'चे सायकलपटू सहभागी असतात. महाशिवरात्रीनिमित्त काहीतरी वेगळे करण्याची कल्पना 'कनक रायडर्स' चे मकरंद वायगंणकर यांना सुचली. महाशिवरात्र म्हटले की श्री शंकराचे भक्त मंदिरात जाऊन श्री शंकराच्या चरणी लीन होतात.
मकरंद वायंगणकर यांनी बुधवारी रात्री ८ वाजता आपल्या 'कनक रायडर्स'च्या व्हाट्सअप ग्रुपवर महाशिवरात्रीनिमित्त रात्री १० ते पहाटे ४ या वेळेत सरप्राईज नाईट सायकल राईड करायची भन्नाट कल्पना मांडली. या नाईट सायकल रायडिंग चा थ्रिल अनुभवण्यासाठी 'कनक रायडर्स' चे मकरंद वायंगणकर, विष्णू रामागडे आणि एस.एम.हायस्कुलचा नववीतील विद्यार्थी नितांत चव्हाण हे लागलीच तयार झाले.
कणकवलीहून बुधवारी रात्री १० वाजता ते निघून महामार्गावरील ओरोस, कुडाळ, झाराप बायपासमार्गे मळगाव आणि परत कणकवली असा १०४ किलोमीटरचा प्रवास गुरुवारी पहाटे ४ वाजता त्यांनी पूर्ण केला. 'सायकलिंग करा, फिट राहा 'असा संदेश देत 'कनक रायडर्स'च्या सायकलपटूंनी केलेल्या नाईट सायकल रायडिंगबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.