संशोधन केंद्राच्या निमित्ताने
By admin | Published: December 15, 2014 09:00 PM2014-12-15T21:00:37+5:302014-12-16T00:04:12+5:30
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरतर्फे अरविंद जाधव यांच्या पुढाकाराने हे अपरांत अभ्यास केंद्र चिपळूणमध्ये उभे राहिले आहे.
अपरान्त संशोधन केंद्राचे चिपळुणात होणारे उद्घाटन हे येथील इतिहास संशोधक, अभ्यासक यांच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरतर्फे अरविंद जाधव यांच्या पुढाकाराने हे अपरांत अभ्यास केंद्र चिपळूणमध्ये उभे राहिले आहे. ज्येष्ठ संशोधक देगलुरकर यांच्याहस्ते किल्ले अभ्यासक प्र. के. घाणेकर यांच्या उपस्थितीत हा समारंभ चिपळूणमध्ये होणार आहे.
चिपळूणसारख्या ठिकाणी अखिल भारतीय स्तरावर संमेलन आयोजित करुन टिळक स्मारक वाचन मंदिर येथील साहित्य चळवळीला वेगळे बळ प्राप्त करुन दिले होते. ८६व्या संमेलनातच संयोजकांनी वाचन मंदिराच्या शेजारील जागेत कोकणातील इतिहास संशोधकांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध व्हावे, तरुण पिढीला इतिहासाच्या खुणा समजाव्यात, त्यामध्ये झालेले कालपरत्वे, भाषापरत्वे बदल, संस्कृती, जीवनशैलीत निर्माण झालेले टप्पे व या साऱ्याच्या कोकणच्या सांस्कृ तिक व ऐतिहासिक वारशावर झालेला परिणाम या साऱ्या गोष्टी येथे अभ्यासकांसाठी खुल्या राहणार आहेत. चिपळूणच्या दृष्टीने हे संशोधन केंद्र संपूर्ण अपरांत भूमीचे केंद्र ठरावे, असा प्रयत्न तेथे होणार आहे.
कोकणची निर्मिती, त्यामागील इतिहास या प्रांतावर झालेले हल्ले, गोमंतक भूमिपासून ते ठाण्याच्या आदिवासी वाड्या - पाड्यापर्यंत पाहायला मिळणारे कोकणचे अवशेष पाऊलखुणा स्वरुपात तरुण पिढीसमोर याव्यात, या हेतूने डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी संमेलनातच त्यावेळी येथील वाचन चळवळीमधील असणाऱ्या साऱ्यांना मार्गदर्शन केले होते. कोकणामध्ये पावलागणिक ऐतिहासिकता पाहायला मिळते. मंदिरांचा इतिहास, गडकोटांची उभारणी, छत्रपती शिवरायांनी उभारलेले सागरी तट, भव्यदिव्य किल्ले या साऱ्यांनी येथील इतिहासप्रेमींना सातत्याने स्फूर्ती दिली आहे. हा इतिहास जागता राहावा व त्यातून जगामध्ये होणाऱ्या कोकणविषयक घडामोडींचा सखोल अभ्यास इतिहासाचे दाखले देत करता यावा, या हेतूनेही अभ्यासकांना हे संशोधन केंद्र म्हणजे पर्वणी ठरणार आहे. सध्या केंद्र सरकारच्या पुरातत्व विभाग अनेक ठिकाणी शिलालेख, किल्ले, अथवा पुरातन वास्तूंची जपणूक करताना पाहायला मिळते. प्रत्यक्षात अनेक किल्ल्यांच्या डागडुजीकडे लक्षही देण्यात येत नसल्याने गिरीप्रेमी विशिष्ट दिवशी जाऊन अशा किल्ल्यांवर उत्सव साजरे करतात. कधीकाळी स्वच्छता, गडांच्या भिंतींवर अथवा तटबंदीवर विकृ त स्वरुपाचे दृश्य असेल तर ते खोडून काढतात. गडांवर होणारे अश्लाघ्य प्रकार नाहिसे होण्यासाठी आपापल्या स्तरावर प्रयत्न करीत असतात. या साऱ्यामध्ये इतिहासकारांची भूमिका महत्त्वाची ठरते. शाळांमध्ये शिकवला जाणारा इतिहास व त्यातून गडप्रेमींसाठी उपलब्ध असणारे इतिहासाचे दाखलेही अनुभवता यावे, या हेतूने प्रयत्न सुरु आहेत. त्यातीलच एक टप्पा अशा संशोधन केंद्राच्या उभारणीतून साध्य होणार आहे. दि. १९ रोजी होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यानिमित्त कोकणातील इतिहासप्रेमी, इतिहासाचा अभ्यास करणारे विद्यार्थी, गिरीप्रेमी मंडळे, स्थानिक स्वयंसेवी संस्था सरकारचे या विषयाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले तर त्यातून एक चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचेल. चिपळूणच्या वाचनालयाने पुढाकार घेऊन एका नव्या टप्प्याला प्रारंभ केला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये गडांची संख्या, ऐतिहासिक स्थळे, शिलालेख, घोडबाव, तोफा, पागा, समाधी मंदिरे आहेत. खेड तालुका सध्या रसाळगड डागडुजीच्या प्रतीक्षेत आहे. भैरवगड, नरेंद्र पर्वत, दुर्गवाडी, गोवळकोट, बाणकोट, अंजनवेलचा गोपाळगड, पूर्णगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यांबरोबरच अनेक गडांवर इतिहास संशोधकांसाठी अभ्यासाला वाव असणाऱ्या ऐतिहासिक दस्तऐवजांची कमी नाही. अशातच अभ्यास करण्यासाठी व हजारो वर्षांपूर्वीचे कोकणसंदर्भातील दाखले यानिमित्ताने उपलब्ध होऊ शकतील. प्रकाश देशपांडे व त्यांचे सर्व सहकारी हे काम संशोधन केंद्राच्या माध्यमातून करतील, असा विश्वास आहे.
- धनंजय काळे