सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोस जनावरे वाहून नेणाऱ्या ट्रक चालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:43 AM2017-10-23T11:43:26+5:302017-10-23T11:52:29+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळपे येथून जनावरांची भरदुपारी राजरोस वाहतूक करणारा ट्रक शुक्रवारी दुपारी मांगवली तिठ्यावर ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. ट्रक चालकाविरुद्ध बेकायदा वाहतुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
वैभववाडी,दि. २३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळपे येथून जनावरांची भरदुपारी राजरोस वाहतूक करणारा ट्रक शुक्रवारी दुपारी मांगवली तिठ्यावर ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. त्या ट्रकमध्ये दहा बैल कोंबलेले होते. ट्रकवरील कारवाईबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे स्पष्ट होत आहे. ट्रक चालकाविरुद्ध बेकायदा वाहतुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणात राजकीय व्यक्तिंचा दबाव वाढल्यामुळे जनावरे तस्करीला व्यापाराचे गोंडस रुप देऊन पोलिसांनी गुन्ह्यातील हवा काढून टाकली. पोलिसांच्या या चलाखीकडे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम कोणत्या चष्म्यातून पाहतात यावर जनावरे वाहतुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
कोळपे, वेंगसर, मांगवलीमार्गे भुईबावडा घाटातून बैल आणि गायींची बेकायदा नियमित वाहतूक केली जाते. याबाबत पोलिसांना स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी कल्पना दिली आहे. मात्र, स्वत:हून पोलीस कारवाई करायला तयार नसल्याने ग्रामस्थांनीच पाळत ठेवून शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास मांगवली तिठ्यावर जनावरांची वाहतूक करणारा ट्रक (एम. एच. ०९; सीए-८५३३) पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला.
राधानगरी तालुक्यातील कसबा येथील महेंद्र वसंत लोकरे हा ट्रकचालक असून तोच मालक होता. ट्रकमध्ये १० बैल होते. कोळपे येथून ती जनावरे कोल्हापूरकडे घेऊन जात होते. जनावरांचा ट्रक पकडल्याचे समजताच एका युवा नेत्याने भ्रमणध्वनीद्वारे पोलिसांशी संपर्क साधून कारवाई न करण्यासाठी दबाव टाकल्याची कुजबूज आहे.
याशिवाय तालुक्यातील काही लोकप्रतिनिधी थेट पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यामुळे ट्रकचालकाचे नाव सांगण्यास पोलिसांनी एकमेकांकडे बोट दाखवून सुरुवातीलाच टोलवाटोलवी केली.
जनावरांच्या बेकायदा वाहतुकीला अभय देऊन दलालांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांबाबत अवैध धंदेवाल्यांसाठी कर्दनकाळ ठरलेले पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम कोणते पाऊल उचलतात याची उत्सुकता आहे.
पोलिसांची भूमिका संभ्रमात टाकणारी
गोहत्याबंदीची कारवाई टाळण्यासाठी कत्तलखान्याकडे नेली जाणारी जनावरे कोपार्डेच्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न अगदी शिताफीने केला गेला आहे. त्यामुळेच ट्रक चालकाविरुद्ध बेकायदा वाहतुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
विशेष म्हणजे कोंडवाडा नसल्याचे कारण पुढे करून ट्रकमधील बैल मूळ मालकांच्या ताब्यात दिल्याचे पोलीस सांगतात. मात्र, बेकायदा जनावरे वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक पोलिसांनी सोडून दिल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.