वित्त समिती सभेला अधिकाऱ्यांची दांडी, सदस्यांनी व्यक्त केली नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:45 PM2019-05-13T12:45:06+5:302019-05-13T12:48:55+5:30
वित्त समिती सभेला विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी दांडी मारत असल्याची बाब आजच्या सभेत उघड झाली. महिन्यातून एक सभा घेता आणि त्यालाही अधिकारी दांडी मारत असतील तर सभा घेतातच का असा प्रश्न नागेंद्र परब यांनी उपस्थित केला
सिंधुदुर्गनगरी : वित्त समिती सभेला विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी दांडी मारत असल्याची बाब आजच्या सभेत उघड झाली. अधिकारी उपस्थित नसल्याने सदस्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तसेच माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे सदस्यांनी सभेत नाराजी व्यक्त केली. तसेच महिन्यातून एक सभा घेता आणि त्यालाही अधिकारी दांडी मारत असतील तर सभा घेतातच का असा प्रश्न नागेंद्र परब यांनी उपस्थित केला.
जिल्हा परिषदेची वित्त समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती जेरॉन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी समिती सचिव तथा जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे, समिती सदस्य संतोष साटविलकर, महेंद्र चव्हाण, नागेंद्र परब, रवींद्र जठार आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आजच्या वित्त समितीला उपस्थित सदस्यांनी विविध मुद्दे आणि प्रश्न उपस्थित करत त्याबाबतची माहिती सभागृहात मागितली. मात्र सभेला काही विभागांचे अधिकारी सोडाच पण कर्मचारीही उपस्थित नसल्याने सदस्यांना त्यांच्या प्रश्नांची माहिती मिळू शकली नाही. काही वेळा तर सभेतून अनुपस्थित अधिकाऱ्यांना सभेत उपस्थित राहण्याचा निरोपही देण्यात आला.
काही काळ त्यांची वाट पाहूनही ते येत नसल्याने महिन्यातून एक सभा होते. त्यालाही अधिकारी दांडी मारत असतील तर सभा घेतातच कशाला असा प्रश्न सदस्य नागेंद्र परब यांनी उपस्थित केला. सदस्य परब यांच्या प्रश्नाला समर्थन देत उर्वरित सदस्यांनीही सभागृहात नाराजी व्यक्त केली. मात्र, या सर्व प्रकारात वित्त अधिकारी अनुपस्थित राहत असलेल्या अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले.
मालवण तालुक्यातील आरोग्य विभागाच्या एका कर्मचाऱ्यांने दुर्धर आजारग्रस्तांना मदतीचे धनादेश परस्पर त्रयस्थ व्यक्तीकडे दिल्याच्या मद्द्यावर चर्चा झाली असता संबंधित कर्मचाऱ्यांने आपली चूक मान्य करत माफी मागितली असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सभेत सांगितले.
कृषी विभागातील झारीतील शुक्राचार्य शोधा : बाळा जठार
जिल्हा परिषद कृषी विभागातील साहित्याची एका बडतर्फ कर्मचाऱ्यांने तोडफोड केली. हा प्रकार अनुचित आहे. मात्र त्याला असे करण्यास कोणी भाग पाडले का? याबाबत चौकशी करा. तसेच लोकप्रतिनिधीने असा प्रकार केला असता तर प्रशासनाने त्याचा बाऊ केला असता. मात्र कर्मचारी आणि प्रशासन यांच्यातील वाद असल्याने त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे असे सांगत या विभागातील झारीतील शुक्राचार्याचा शोध घ्या अशी सूचना सदस्य बाळा जठार यांनी सभेत केली.
...अन्यथा प्रशासनच जबाबदार राहील
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे कणकवली तालुका व्यवस्थापक हे तालुक्यातील समूह संघटक महिलांशी गैरवर्तन करत आहे. त्याबाबत अनेक महिलांच्या तक्रारी आहेत. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्याला चार वेळा समज देण्यात आली आहे. मात्र त्याच्या वागणुकीत फरक झालेला नाही. त्यामुळे त्या अधिकाऱ्याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. परंतु, प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे त्या उपद्रवी अधिकाऱ्याला लोकांकडून प्रसाद मिळाल्यास त्याला प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी सभेत दिला.