जमावाच्या भीतीने अधिकारी पळाले
By admin | Published: December 9, 2014 08:24 PM2014-12-09T20:24:22+5:302014-12-09T23:24:38+5:30
कार्यालयाला टाळे : सावंतवाडीतील नागरिकांच्या संतप्त भावना
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात पुन्हा तीन ठिकाणी विद्युत तारा कोसळल्या. त्यानंतर संतप्त जमावाने वीज कंपनीच्या कार्यालयाचा ताबा घेतला. तसेच जोपर्यंत शहरातील सर्व विद्युत तारांची तपासणी होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवा, अशी मागणी केली. नागरिकांच्या उद्रेकामुळे कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पळ काढला.
सावंतवाडी शहरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या गंभीर प्रकारानंतर पुन्हा तशीच घटना सोमवारी घडली. शहरातील तीन ठिकाणी या विद्युत तारा कोसळल्याने संपूर्ण शहरातील विद्युत पुरवठाच खंडित झाला होता. यात शहरातील चंदू भवन येथे तर खांबावर मोठा आगीचा भडका उडला. ही आग सालईवाडा येथील मच्छीमार्केट व संचयनीपर्यंत गेली. मात्र, सालईवाडा येथे विद्युतवाहिनी कोसळली ती रिक्षेवरच. त्यात दोन युवक सुदैवाने बचावले.
तर शहरातील साईबाबा मंदिर परिसरातही विद्युत खांबावर विजेचे लोळ पाहण्यास मिळाले. यामुळे अनेकांनी आपली दुकाने बंद केली. तसेच मिळेल त्याठिकाणी रिक्षाचालक, दुकानमालक सैरावैरा धावू लागले. हा प्रकार दहा मिनिटे सुरू होता. यानंतर नागरिक संतप्त झाले आणि आपला मोर्चा विद्युत कंपनीच्या कार्यालयावर वळवला. नागरिक मोठ्या संख्येने कार्यालयावर चाल करून येत असल्याचे पाहून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून पळ काढला. यावेळी काही नागरिकांनी तर कार्यालयावर जोरदार दगडफेक केली तर काहींनी कार्यालयातील दूरध्वनी बाहेर फेकून देत साहित्याची नासधूस केली.
नागरिकांनी विद्युत कार्यालयाकडून मच्छीमार्केटनजीक कार्यरत असलेल्या विद्युत अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेराव घालत धक्काबुक्की केली. तुम्हांला आमचा जीव म्हणजे काय चेष्टा वाटते का? असे म्हणत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र पोलिसांनी वेळीच यात हस्तक्षेप केला तरीही नागरिक त्या अधिकाऱ्यांचा पाठलाग करत होते.
यावेळी मंदार नार्वेकर, चेतन नेवगी, बाबा डिसोझा, देवेंद्र सूर्याजी, बेटा नार्वेकर, सुशांत पोकळे, बाबल्या दुभाषी, आनंद नेवगी, शशी देऊलकर, शैलेश गवंडळकर, राजू पनवेलकर, बाळ बोर्डेकर, सतीश नार्वेकर, उमेश कोरगावकर आदींनी सहभाग नोंदवला होता. रात्री उशिरापर्यंत शहरातील विद्युत प्रवाह खंडित झाला होता. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेत वीज कर्मचारी वीज खांबावरील आपले काम करीत होते.
दरम्यान, या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार, उपनिरीक्षक दिलीप वेडे, केशव पेडणेकर, अमोल सरगळे, मिलींद देसाई, सुनिल पवार आदी वीज कार्यालयाकडे तळ ठोकून होते. पोलिसांनीही समजावण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)