अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांना 'शॉक' ट्रीटमेंट देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 06:53 PM2021-02-22T18:53:54+5:302021-02-22T18:56:16+5:30

mahavitaran NiteshRane Sindhudurg- पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्र्यांच्या आदेशाला वीज अधिकाऱ्यांनी भीक घातलेली नाही. मात्र, अशी अरेरावी करणाऱ्या विजअधिकाऱ्यांना वेगळ्या प्रकारे 'शॉक ट्रीटमेंट' भाजपा कार्यकर्ते देतील असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

Officers will be given 'shock' treatment | अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांना 'शॉक' ट्रीटमेंट देणार

अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांना 'शॉक' ट्रीटमेंट देणार

Next
ठळक मुद्देअरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांना 'शॉक' ट्रीटमेंट देणार नितेश राणे यांचा इशारा ; वीज जोडणी तोडण्याचा मुद्दा

कणकवली : पालकमंत्री उदय सामंत यांची जिल्हा व्यापारी संघाने भेट घेतल्यानंतर मला विचारल्याशिवाय कोणाचीही विज तोडायची नाही. असा त्यांनी मारलेला 'डायलॉग 'फसवा आहे. या डायलॉगबाजीनंतरही सोमवारी सकाळी सिंधुदुर्गात विज अधिकारी विजतोडणीसाठी फिरताना दिसून आले आहेत. त्यामुळे पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्र्यांच्या आदेशाला वीज अधिकाऱ्यांनी भीक घातलेली नाही. मात्र, अशी अरेरावी करणाऱ्या विजअधिकाऱ्यांना भाजपा कार्यकर्ते वेगळ्या प्रकारे 'शॉक ट्रीटमेंट' देतील असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

कणकवली नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षांच्या दालनात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, बांधकाम सभापती मेघा गांगण, गटनेता संजय कामतेकर, नगरसेवक अभिजित मुसळे, रवींद्र गायकवाड, विराज भोसले, किशोर राणे , बंडू गांगण आदी उपस्थित होते.

यावेळी नितेश राणे म्हणाले, ठाकरे सरकार कोरोना काळात कोणालाही नुकसान भरपाई देऊ शकले नाही.तर त्यांचे मंत्रीही जनतेला फसवत आहेत. कोरोना काळात व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मुंबई येथे झालेल्या मायकल जॅक्सनच्या शोला करमाफी ठाकरे सरकार देते . मात्र, सामान्य नागरिकांना विज बिलमाफी का देत नाही ? असा सवालही आमदार राणे यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, मायकल जॅक्सन आणि ठाकरे कुटुंबाला एक न्याय आणि सामान्य जनतेला दुसरा न्याय असे कसे चालेल ? अन्याय होत असेल तर आम्ही जनतेच्या बाजूने आवाज उठवणार आहोत. दमदाटी करून विज जोडणी तोडली तर वीजअधिकाऱ्यांना कसा 'शॉक' द्यायचा हे भाजपा कार्यकर्त्यांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात या अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांना यापुढे पोलीस संरक्षण द्यावे लागले तर त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही. पोलीस प्रशासन आणि सरकारच त्याला जबाबदार असेल. असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिला.

हा तर राजकीय कोरोना !

१ मार्चला राज्य विधिमंडळ अधिवेशन आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक मंत्री कोरोना बाधित होत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मंत्री नाहीत, अशी परिस्थिती सरकार मुद्दामहून निर्माण करत आहे का ? आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री छगन भुजबळ,मंत्री जयंत पाटील यांना आता कोरोना झाला आहे.त्यामुळे हा वेगळा राजकीय कोरोना तर नव्हे ना ? असा प्रश्न आम्हाला पडत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेला आपण त्याबाबत संशोधन करण्यासाठी पत्र लिहणार आहे. असा टोला आमदार नितेश राणे यांनी यावेळी लगावला .

फोटो - नितेश राणे

Web Title: Officers will be given 'shock' treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.