अधिकाऱ्यांनी प्रामाणिक जनसेवा करावी
By admin | Published: October 27, 2015 10:12 PM2015-10-27T22:12:29+5:302015-10-27T23:56:36+5:30
ग. दि. कुलथे : सिंधुदुर्गनगरी येथील ‘पगारात भागवा’ अभियानात शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन
सिंधुदुर्गनगरी : शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याबाबत दक्ष राहून प्रामाणिक जनसेवा केली पाहिजे. खरे तर एखाद दुसऱ्या भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यामुळे संपूर्ण व्यवस्थेला गालबोट लागते. त्यामुळे सर्वसामान्य जनता प्रामाणिक अधिकाऱ्यांकडेही संशयाने पाहू लागते. हे लक्षात घेता, लोककल्याणकारी योजनांची प्रभावीरीत्या अंमलबजावणी आणि प्रशासन पारदर्शक व लोकाभिमुख ठेवण्यासाठी बहुतांशी अधिकारी व कर्मचारी कर्तव्यदक्ष आहेत, याची वस्तुनिष्ठ प्रचिती नागरिकांना आणून देणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘पगारात भागवा’ याविषयी कर्मचारी, अधिकारी वर्गाला मार्गदर्शन करताना कुलथे म्हणाले, शासकीय कामकाजातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन व्हावे व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत सामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण व्हावा याकरिता महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने राज्यभर अधिकारी व कर्मचारी यांच्या पातळीवर ‘पगारात भागवा’ हे भ्रष्टाचारविरोधी प्रबोधनात्मक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. या अभियानाच्या सकारात्मक अंमलबजावणीकरिता शासन पातळीवरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सहचिटणीस सुदाम टाव्हरे व गणेश राठोड आदी उपस्थित होते.
कुलथे म्हणाले, या अभियानाव्दारे राज्यभर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. या अभियानाच्या सकारात्मक परिणामाकरिता अधिकारी, कर्मचारी व जनता या सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. पगार, भत्ते, बढत्या यांसारख्या रास्त मागण्यांकरिता राज्य महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने नेहमी पाठपुरावा केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने केलेल्या विविध मागण्यांच्याबाबत शासन सकारात्मक असून आपणही जनतेप्रती असलेले आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे. याकरिता या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात आतापर्यंत २२ जिल्हा प्रशासकीय पातळीवर बैठका घेण्यात आल्या आहेत.
राज्यभर या अभियानाचा जागर सुरू करण्यात आला असल्याची माहितीही यावेळी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी दिली. (प्रतिनिधी)