आजारपण, गरीबीमुळे वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:34 PM2017-09-04T23:34:15+5:302017-09-04T23:34:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वेंगुर्ले : परिस्थिती बेताचीच.. त्यातच वयोवृद्ध पत्नीचे भयावह आजारपण... त्याला लागणारे सततचे पैसे यामुळे त्रासलेल्या शिरोडा शिसामुणगेवाडी येथील वृद्ध दाम्पत्याने घरातच एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. सुरेश राजाराम मयेकर (वय ७५) व सुनीता मयेकर (६९) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयेकर दाम्पत्य शिरोडा शिसामुणगेवाडी येथील घरात राहत होते. कोणाचाच आधार नसल्याने ते एकाकी पडले होते. त्यातच सुनीता या गेली कित्येक वर्षे आजारी होत्या. त्या नेहमी अंथरुणालाच खिळून असायच्या. त्यामुळे मोलमजुरी करून सुरेश यांना पत्नी सुनीताचीही देखभाल करावी लागत होती. मोलमजुरी करीत असल्याने त्यांच्याकडे जेमतेम पैसे असायचे. त्यामुळे पत्नीच्या औषधोपचारासाठी लागणारा खर्च करण्याएवढीही त्यांची परिस्थिती नव्हती. मूलबाळ नसल्याने त्यांना आपल्या चुलत नातेवाइकांकडेच मदत मागावी लागे. या सर्व गोेष्टीला कंटाळून सोमवारी सकाळी त्या दोघांनी आपल्या राहत्या घरात एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
सकाळी मयेकर दाम्पत्य बाहेर न दिसल्याने तसेच त्यांचा काही आवाज ऐकू न आल्याने शेजाºयांनी घरात पाहिले असता मयेकर दाम्पत्य गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. या घटनेची माहिती सुरेश मयेकर यांचा भाऊ सीताराम मयेकर यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर शिरोडा दूरक्षेत्राच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. वेंगुर्ले पोलीस निरीक्षक महादेव कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेबाबत माहिती घेतली.
शिरोडा परिसरात हळहळ
मयेकर दाम्पत्याने अचानक जीवन संपविण्याच्या घेतलेल्या निर्णयाने शिरोडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आजारपणाला कंटाळून पती-पत्नीने जीवन संपविले असले तरी या दोघांना मागे बघण्यासाठी कोणीही नव्हते. त्यातच पत्नीच्या आजारपणासाठी लागणारे पैसे कोठून आणायचे असा प्रश्न सुरेश यांना सतत भेडसावत होता. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला.