भंगसाळ नदीवरील जुना पूल इतिहासजमा होणार, चौपदरीकरणामुळे पाडण्याचे काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 04:58 PM2019-02-06T16:58:45+5:302019-02-06T17:00:45+5:30
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील कुडाळला जोडणारा भंगसाळ नदीवरील जुना पूल चौपदरीकरणामुळे पाडण्याचे काम सुरू झाले आहे. गेली अनेक दशके अविरत सेवा देणारा, मात्र पावसाळ््यात पुराच्या पाण्यामुळे महामार्ग ठप्प करणारा हा पूल आपल्या जुन्या आठवणी मागे ठेवून आता इतिहासजमा होणार आहे.
कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील कुडाळला जोडणारा भंगसाळ नदीवरील जुना पूल चौपदरीकरणामुळे पाडण्याचे काम सुरू झाले आहे. गेली अनेक दशके अविरत सेवा देणारा, मात्र पावसाळ््यात पुराच्या पाण्यामुळे महामार्ग ठप्प करणारा हा पूल आपल्या जुन्या आठवणी मागे ठेवून आता इतिहासजमा होणार आहे.
जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू असून, महामार्गालगतच्या अनेक जुन्या वास्तू या कामात इतिहासजमा झाल्या आहेत. महामार्गावरील अनेक ब्रिटिशकालीन पूल पाडून त्या जागी नवीन पूल बांधण्यात येत आहेत. कुडाळ शहरातून जाणाऱ्या भंगसाळ नदीवरील पूल काही वर्षांपूर्वी बांधला होता.
आता या पुलाच्या बाजूला भव्य असा नवीन पूल तयार झाला असून, जुन्या पुलाच्या जागेवर दुसरा एक पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पुलाच्या बाजूने पर्यायी मार्ग तयार करण्यात आला असून, या मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
सोमवारपासून भंगसाळ नदीवरील जुन्या पुलाचे बांधकाम तोडण्याचे काम दिलीप बिल्डकॉन कंपनीने सुरू केले आहे. महामार्ग झाल्यापासून या पुलाने जिल्हावासीयांना अविरत सेवा दिली असून, कोणतीही अनुचित घटना या पुलाकडे घडली नाही, हे या वैशिष्ट्य आहे. नव्या गोष्टींसाठी जुन्याचा त्याग करावा लागतोच. त्यामुळे आपल्या जुन्या आठवणी मागे ठेवून भंगसाळ नदीवरील हा पूलही आता इतिहासजमा होणार आहे.
भंगसाळवर पाणी म्हणजे मोठा पाऊस!
पावसाळ््यात भंगसाळ नदीला पूर आल्यानंतर काही वेळा पुराचे पाणी या पुलावरूनही वाहत असते. एका पावसाळ्यात किमान दोन ते तीन वेळा तरी असा प्रकार घडून महामार्गावरील वाहतूक ठप्प होत असे. त्यामुळे भंगसाळ पुलावरून पाणी म्हणजे मोठा पाऊस, असे मोजमापच जिल्ह्यात तयार झाले होते.