मोटार दरीत कोसळून वृद्ध दाम्पत्य ठार
By admin | Published: May 16, 2016 12:31 AM2016-05-16T00:31:00+5:302016-05-16T00:37:11+5:30
चौघे गंभीर : संगमेश्वर तालुक्यातील वांद्रीजवळ दुर्घटना; जखमी सर्व एकाच कुटुंबातील
देवरूख : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील वांद्रीजवळ अल्टो कार दरीत कोसळून एकाच कुटुंबातील दोनजण ठार, तर चौघे गंभीर जखमी झाले. रविवारी दुपारी पावणे दोन वाजता हा अपघात झाला. अपघातग्रस्त शिर्के कुटुंब मीरा रोडहून कुर्णे (लांजा) येथे आपल्या मूळ गावी चालले होते.
बाळकृष्ण सखाराम शिर्के (वय ६०), राजश्री बाळकृष्ण शिर्के (५५) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध दाम्पत्याची नावे असून, गाडीतील अन्य आनंदा बाळकृष्ण शिर्के (३५), मधुरा आनंदा शिर्के (३०), हर्षली आनंदा शिर्के (४) व वर्णवी आनंदा शिर्के (३) हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत.
रविवारी सकाळी शिर्के कुटुंबीय मीरा रोडवरून कोकणात सुटीसाठी आपल्या मूळ गावी कुर्णे येथे अल्टो कार (एमएच-४ जीजे ३१५८)ने चालले होते. दुपारी १.३० च्या दरम्यान ते वांद्री येथील सप्तलिंगी नदीपुलाजवळ आले असता त्यांची मोटार विरुद्ध दिशेला जाऊन १५ फूट खोल दरीत कोसळली व शेवटी ती एका झाडावर आदळली.
अपघाताचे वृत्त कळताच नरेंद्राचार्य महाराज संस्थानची हातखंबा येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली. त्याचे चालक धनेश केतकर यांनी वाहतूक पोलिस, स्थानिकांच्या मदतीने मृत व जखमींना दरीतून बाहेर काढले. त्याचदरम्यान शासनाची १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी आली. दोन्हींतून मृतदेह व जखमींना रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
घटनास्थळी सारे दृश्य हृदयद्रावक होते. आजी-आजोबांचा जागीच झालेला मृत्यू, मुलांनी फोडलेला टाहो बघ्यांचे हृदय पिळवटून टाकत होता. (प्रतिनिधी)