जुनी पेन्शन योजना: सावंतवाडी नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, काही कर्मचारी कामावर हजर
By अनंत खं.जाधव | Published: March 17, 2023 05:22 PM2023-03-17T17:22:30+5:302023-03-17T17:22:54+5:30
संपातून बाहेर पडल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही
सावंतवाडी : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. मागण्यांवर तोडगा न निघाल्याने जिल्ह्यात आजही आंदोलन सुरूच असताना सावंतवाडी नगरपरिषद मध्ये मात्र आज, शुक्रवारी संपात फूट पडली. संपात सहभागी झालेले १४ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तर उर्वरित कर्मचारी अद्याप संपात सहभागी आहेत.
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसापासून संप सुरू आहे. या संपात सर्वच कर्मचारी तसेच शिक्षक सहभागी झाले होते. यातील प्राथमिक शिक्षण संघातील काही कर्मचाऱ्यांनी मात्र पहिल्या दिवशीच या संपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ही इतर कर्मचारी मात्र अद्याप संपात सहभागी आहेत.
मात्र आता हळूहळू काही ठिकाणी कर्मचारी संपातून बाहेर पडू लागले आहेत. याचाच प्रत्यय सावंतवाडीत आला. सावंतवाडी नगरपरिषदेतील ६४ कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यातील १४ कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली आहे. या माघारीमुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडल्याचे दिसून आले. संपातून बाहेर पडलेले १४ ही कर्मचारी कामावर हजर झाले असून उर्वरित ५० कर्मचारी अद्याप संपात सहभागी आहेत.
दरम्यान संपातून बाहेर पडल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देविदास आडारकर यांना विचारले असता त्यांनीही कर्मचारी संपातून का बाहेर पडले याची आपणास माहित नाही. प्रत्येकाचा निर्णय असतो असे सांगितले. बाकी सर्व कर्मचारी हे संपात सहभागी झाले असून संप यशस्वी करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.