जीर्ण इमारतींना मिळणार नवे रूप
By admin | Published: June 18, 2015 10:37 PM2015-06-18T22:37:46+5:302015-06-18T22:37:46+5:30
४७ लाखांचा निधी दुरुस्तीसाठी मंजूर : जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील इमारती
कणकवली : विशेष इमारत दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मालकीच्या पंचायत समिती स्तरावरील इमारतींच्या दुरुस्तीसाठी ४७ लाख ४५ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमध्ये कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण, वैभववाडी येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतींची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे जीर्ण इमारतींना नवे रूप प्राप्त होणार आहे.जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या परंतु पंचायत समिती अथवा सार्वजनिक बांधकाम उपविभाग तसेच विश्रामगृहासाठी वापरण्यात येत असलेल्या अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यांचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. विविध तालुक्यातील अशा इमारतीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी नसल्यामुळे या इमारती अनेक वर्षे नादुरुस्त अवस्थेत वापरल्या जात आहेत. अनेक इमारतींची छप्परे मोडकळीस आली असून, पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून राज्य शासनाकडून इमारत दुरुस्तीसाठी निधीची मागणी करणारा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील आठ इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे रत्नागिरी येथील अधीक्षक अभियंता यांच्याकडून जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे निधी मंजुरीचे आदेश प्राप्त झाले आहेत. लवकरच या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ्यानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
विशेष दुरुस्ती इमारत कार्यक्रमांतर्गत सर्वाधिक निधी कणकवली पंचायत समितीच्या आवारातील इमारतींसाठी प्राप्त झाला आहे. त्यामुळे कणकवली बांधकाम उपविभागाच्या रेकॉर्ड रुमचे छप्पर दुरुस्त करणे, उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कणकवली यांचे निवासस्थान दुरुस्ती व नूतनीकरण, उपअभियंता कार्यालय इमारतीची दुरुस्ती तसेच कणकवली पंचायत समिती कार्यालयाच्या इमारत दुरुस्तीलाही मंजुरी देण्यात आली आहे.
वेंगुर्ले पंचायत समिती कार्यालय इमारत दुरुस्ती, मालवण विश्रामगृह इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण, सावंतवाडी पंचायत समितीच्या लघुपाटबंधारे कार्यालयाच्या रेकॉर्ड रुमची दुरुस्ती, वैभववाडी शासकीय विश्रामगृहाची अंतर्गत सजावट व नूतनीकरण या कामांसाठी एकत्रितपणे ४७ लाख ४५ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून इमारतींचे छप्पर, अंतर्गत सजावट, रंगकाम, दरवाजे, खिडक्यांची दुरुस्ती, विद्युतीकरण, फरशी नूतनीकरण
अशी कामे करण्यात येणार आहेत. (वार्ताहर)
निधी मंजुरीचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे रत्नागिरी येथील अधीक्षक अभियंता यांच्याकडून जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे निधी मंजुरीचे आदेश प्राप्त झाले आहेत. लवकरच या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन पावसाळ्यानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार.
विशेष दुरुस्ती इमारत कार्यक्रमांतर्गत सर्वाधिक निधी कणकवली पंचायत समितीच्या आवारातील इमारतींसाठी प्राप्त.