‘आॅलिव्ह रिडले’ची पिल्ले समुद्रात झेपावली
By admin | Published: March 7, 2016 11:27 PM2016-03-07T23:27:44+5:302016-03-08T00:36:42+5:30
गुहागर किनारा : वन विभागातर्फे चालू हंगामात पाच घरटी
गुहागर : गुहागर समुद्रकिनारी वन विभागातर्फे चालू हंगामात पाच घरटी करण्यात आली असून, यातून आज पहिल्या टप्प्यात ८९ आॅलिव्ह रिडले कासवाच्या पिल्लांना समुद्रामध्ये सोडण्यात आले.गुहागर तालुका वन विभागातर्फे चालू हंगामात गुहागर समुद्रकिनारी कासवांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित अशी पाच घरटी करण्यात आली आहेत. थंडीच्या हंगामात मादी कासवांची घातलेली अंडी सुरक्षित राहावी, यासाठी सुदेश कदम या स्थानिक कासवमित्राची नेमणूक करण्यात आली आहे. १० डिसेंबरपासून पाच वेगवेगळ्या घरट्यांमध्ये तब्बल ६८६ अंडी ठेवण्यात आली आहेत. यामधील नक्षत्रवन येथील घरट्यामध्ये १२० अंडी ठेवण्यात आली होती. यामधील ८९ कासवांची पिल्ले आज सुरक्षितरित्या गुहागर समुद्रामध्ये सोडण्यात आली. विभागीय अधिकारी विकास जगताप, परिक्षेत्र वन अधिकारी जी. एन. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कासव संरक्षण मोहीम आणखी प्रबळ करणार असल्याचे वनपाल सुधाकर गुरव यांनी सांगितले.
यावेळी सहाय्यक वनपाल मिलिंद डाफळे, नीलेश कुंभार, रानबा बबरगेकर, एम. जी. पाटील, सहाय्यक लागवड अधिकारी सी. बी. तावडे व पंचायत समिती उपसभापती सुनील जाधव, मयुरेश साखरकर, नथुराम जानवळकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)