CoronaVirus Lockdown : ८ एकरातील लिलीच्या फुलशेतीचे लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 01:58 PM2020-04-06T13:58:39+5:302020-04-06T14:02:11+5:30
कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. याचा फटका सर्वांबरोबरच शेतकऱ्यांनाही बसला आहे. बँकेचे कर्ज घेऊन दिवस-रात्र शेतात राबून आता उत्पादनावेळी कोरोना विषाणूचा प्रभाव वाढल्याने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात ८ एकर शेतजमिनीत मल्हार कुटुंबीयांनी लिली या फुलशेतीची लागवड केली आहे. मात्र, फूल मार्केट बंद असल्याने बाजारपेठ मिळणे कठीण झाले आहे.
रामचंद्र कुडाळकर
तळवडे : कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. याचा फटका सर्वांबरोबरच शेतकऱ्यांनाही बसला आहे. बँकेचे कर्ज घेऊन दिवस-रात्र शेतात राबून आता उत्पादनावेळी कोरोना विषाणूचा प्रभाव वाढल्याने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात ८ एकर शेतजमिनीत मल्हार कुटुंबीयांनी लिली या फुलशेतीची लागवड केली आहे. मात्र, फूल मार्केट बंद असल्याने बाजारपेठ मिळणे कठीण झाले आहे.
निरवडे येथील विवेक वासुदेव मल्हार, बाबली विठू मल्हार, शोभा नंदकिशोर मल्हार, आरती रमाकांत मल्हार या चार शेतकºयांनी लिली फुलशेतीची लागवड केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे फूल मार्केट बंद असल्याने ही फुले कोण घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
विवेक मल्हार, बाबली मल्हार, शोभा मल्हार, आरती मल्हार हे गेली अनेक वर्षे ही लिली फुलशेती करतात. सध्या फुलशेतीचे उत्पादनही चांगले होते. यावर्षी ही फुलशेती बहरली होती. मात्र, यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे फूल मार्केटही बंद आहे. बाजारपेठेच पूर्णत: ठप्प असल्याने या शेतकऱ्यांच्या फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
विवेक वासुदेव मल्हार यांचे महिन्याला ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बाबली विठू मल्हार यांचे १ लाखाचे, शोभा नंदकिशोर मल्हार यांचे ५० हजार रुपयांचे तर आरती रमाकांत मल्हार यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. एक महिन्याचा विचार करता जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोना विषाणूमुळे या शेतकऱ्यांच्या फुलशेतीला कसा फटका बसला याविषयी जाणून घेतले असता त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
निरवडे येथील शेतकऱ्यांचा एकत्रित विचार करता या शेतकऱ्यांनी रात्रं-दिवस काबाडकष्ट करून जवळपास ८ एकर शेतजमिनीत लिली फुलशेतीची लागवड केली होती. या फुलशेतीवर त्याचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन असल्याने तयार झालेल्या लिली फुलांचे दिवसाला हजारो रुपयांचे नुकसान होताना दिसत आहे. फुलांची तोडणी न केल्यामुळे ती सुकून गेली आहेत.
ही फुलशेती करण्यासाठी केलेला खर्च जास्त असून उत्पन्न काहीच नाही अशी परिस्थिती आहे. शासनाने आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी या शेतकऱ्यांतून होत आहे. आज सरकार शेतकºयांना शेती करा व आर्थिक उन्नती साधा असा सल्ला देते. मात्र, आज या शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे.
गोव्यातील फुलांचे मार्केट झाले बंद, उलाढाल पूर्णपणे ठप्प
निरवडे येथील हे शेतकरी गोव्यातील म्हापसा, पणजी तसेच अन्य बाजारपेठेत ही फुले नेऊन विकतात. पण सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच ठिकाणच्या बाजारपेठा बंद आहेत. पूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातलेल आहे. त्यामुळे सध्या या फुलांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
कोरोना विषाणूमुळे सध्या शेतकरीवर्ग मोठ्या नुकसानीमध्ये सापडला आहे. रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेती केली. पण जेव्हा यातून फायदा मिळणार होता तेव्हा मात्र नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने आम्हां शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य करावे.
- रोहन मल्हार,
युवा शेतकरी, निरवडे, सावंतवाडी
आम्ही शेती करण्यासाठी जो खर्च केला त्यातून आर्थिक फायदा मिळणे कठीण बनले आहे. दिवसाला आमचे दोन हजार रुपयांचे नुकसान होत आहे. एक महिना बाजारपेठ बंद राहिल्यास आमचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. आमची मेहनत पूर्णपणे वाया गेली आहे.
- विवेक मल्हार, शेतकरी,
निरवडे, सावंतवाडी
बाजारपेठ बंद असल्याने आमचा माल विकायचा कसा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आज मोठ्या प्रमाणत लिलीची फुले शेतात खराब होत आहेत. माल असून आम्ही तो विकू शकत नाही अशी बिकट अवस्था झाली आहे. आमचे यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
- बाबली मल्हार, शेतकरी,
निरवडे, सावंतवाडी