रेल्वे तिकिटांच्या काळाबाजारप्रकरणी एकाला अटक; रेल्वे पोलिसांची कारवाई
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 1, 2024 07:53 PM2024-04-01T19:53:23+5:302024-04-01T19:53:32+5:30
कणकवली बाजारपेठेतून घेतले ताब्यात
महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : रेल्वे तिकिटांचा काळाबाजारप्रकरणी एका संशयिताला रेल्वे पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी अधिक माहिती घेतली जात आहे. उद्या दि. २ एप्रिल रोजी त्याला येथील न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
रेल्वे पोलिसांनी बाजारपेठेतील एका दुकानामध्ये कामाला असलेल्या तरूणाला सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. त्या तरूणाने आयआरसीटी ॲपवरून रेल्वेची मर्यादेपेक्षा अधिक तिकिटे काढून ग्राहकांना विक्री केली होती. याबाबत आयआरसीटीसीकडून रेल्वे पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर रेल्वे तिकिट काढून देणाऱ्या या संशयित तरूणाची माहिती घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.
इतर एजंटामध्ये उडाली खळबळ
रेल्वे तिकीट काळाबाजार प्रकरणी एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त समजल्यानंतर शहरातील इतर तिकीट विक्री एजंटामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान रेल्वे तिकीट विक्री आणि बुकिंगसाठी वापरला जाणारा मोबाइल, कॉम्प्युटर आदी साहित्यदेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयिताला अधिक चौकशी करून त्याला २ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.