मळगावात दीड दिवसाची नागपूजा
By admin | Published: August 18, 2015 11:39 PM2015-08-18T23:39:27+5:302015-08-18T23:39:27+5:30
श्रावणातील पहिला सण : गोसावी कुटुंबियांची २०० वर्षांची परंपरा
राजन वर्धन- सावंतवाडी -एक दिवसाचा, दीड दिवसाचा, तीन दिवसाचा, पाच दिवसाचा गणपती उत्सव आपण पाहिला आहे. पण बुधवारी साजरी होणारी नागपंचमी बहुधा एक दिवसाचीच असते. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे दीड दिवसाची नागपंचमी गेली दोनशे वर्षे अखंड सुरू आहे. गोसावी कुटुंबियांमार्फत सुरू असणारी ही नागपंचमी तालुक्यात चर्चेचा विषय बनून राहिली आहे. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला महत्त्वाचे स्थान आहे. पांरपरिकसण, उत्सवातील धार्मिकता जोपासणारा व प्राणीमात्रांविषयी प्रेम निर्माण करणाऱ्या सणातील महत्त्वाचा सण म्हणूनही याकडे पाहिले जाते. नागपंचमी दिवशीपूर्वी महिला रानावनात जाऊन वारुळाजवळ जाऊन तेथे नागदेवतेची पूजा करत असत. यावेळी दुध, पातोळे असे पदार्थ नागराजासमोर ठेवून त्याला माया लावली जात असे. यातून महिला नागाला आपला भाऊ मानून त्याला वंदन करायच्या. यातून नाग व माणूस याचे एक प्रेमाचे नाते निर्माण झाले. पण या सापांना पकडून गारूडी खेळ करून पैसा मिळवून आपला उदरनिर्वाह करत. या खेळाला तस्करीने ग्रासले व सापाच्या विषाची विक्री होऊ लागली. त्यातूनच ही वारूळे कमी झाली आणि घरोघरी मातीच्या नाग मूर्तींची पूजा होऊ लागली. ती आजपर्यंत सुरू आहे.
नागपंचमी दिवशी नागाची मूर्ती आणून तिला लाह्या चिकटवून दुधाचा व पातोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. सकाळी मूर्ती आणून सायंकाळी पाचच्या सुमारास त्याचे विसर्जन करण्यात येते. वडिलोपार्जित आलेल्या या परंपरेचा मान यावर्षी रामचंद्र बंडू गोसावी यांना असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गोसावी व धर्मनाथ गोसावी बंधू नागपंचमीची तयारी करत आहेत. या अनोख्या उत्सवाची जपणूक करताना नागमूर्तीची सजावट आकर्षक केली जाते. त्यादिवशी देखावाही केला जातो. शिवाय रात्री झिम्मा फुगडी, महिलांची पांरपरिक समूह गीते यांचे सादरीकरण केले जाते. त्यामुळे येथील नागपंचमी उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतून अनेकजण भेट देतात.
नागपंचमी दिवशीच्या पूर्वसंध्येला ब्राम्हण भोजन, एकादशमी केली जाते. यावेळी कुलदेवतेची पूजा केली जाते. नागपंचमी दिवशी सकाळी नागाची मूर्ती आणून सजवली जाते. यावेळी चाफी, दुर्वा, बेल यांचा वापर केला जातो. त्यानंतर विधीवत पूजा करताना दुध व लाह्यांचा नैवेद्य दिला जातो. दुपारी पातोळ्यांचा नैवेद्य दिला जातो. तर सायंकाळी पुन्हा सर्वांच्या उपस्थितीत पूजा करून रात्री उशिरापर्यंत झिम्मा-फुगड्या, समूह गीतांचा महिलांचा कार्यक्रम साजरा केला जातो. यानंतर भजन-अभंगांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी तुपातील करंज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. सायंकाळी सवाद्य मिरवणूक व फटाक्यांच्या आतषबाजीत अळवाच्या पानात विसर्जन केले जाते. विसर्जनानंतर शेगलाची भाजी व भाकरी असा प्रसाद वाटला जातो. भावनिक वातावरणात विसर्जन केल्यानंतर घरातील महिला गहिवरतात.