मालवणमध्ये पर्यटकांची बोट उलटली; एका महिलेचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 03:40 PM2019-12-05T15:40:19+5:302019-12-05T15:40:28+5:30
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मालवण: तालुक्यातील देवबाग संगम खाडीपात्रात बोटिंगसाठी पर्यटकांना घेऊन गेलेली बोट वाऱ्यामुळे उलटल्याची दुर्घटना गुरुवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत माया आनंद माने (वय ६०, रा. आंबिवली, कल्याण) या महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. तर अनया अमित अणसुळे (वय ३, रा. बदलापूर) ही मुलगी गंभीर झाल असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ठाणे, कल्याण परिसरातील पर्यटकांचा ग्रुप देवबागमध्ये पर्यटनासाठी आला होता. गुरुवारी सकाळी हे पर्यटक बोटीने देवबाग खाडीपात्रात बोटिंग करत असताना देवबाग संगम परिसरात ही बोट उलटली. यावेळी ९ पर्यटक पाण्यात फेकले गेले. यामध्ये ५ महिला, ३ लहान मुले आणि एका पुरुषाचा समावेश होता. बोट समुद्रात उलटल्यानंतर स्थानिक मच्छीमारांनी या सर्वांना पाण्याबाहेर काढून उपचारासाठी मालवणातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र यातील माया माने या महिला पर्यटकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर अनया अणसुळे या लहान मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात येणार आहे. या दुर्घटनेमुळे खाडीपात्र आणि सागरी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.