एकीच्या बळावर त्यांनी फुलविली शेती
By admin | Published: October 22, 2016 10:29 PM2016-10-22T22:29:35+5:302016-10-22T22:29:35+5:30
भाजीपाला, भातपिकांतून साधली उन्नती : बिबवणेतील ‘सद्गुरू व अष्टविनायक’ बचत गटाच्या महिलांची किमया
कुडाळ : कोकणातील शेतामध्ये राबायला मनुष्यबळ मिळत नाही. त्यामुळे शेती पडीक राहते. यामुळे उत्पादन खर्च वाढतो. यावरचा उत्तम उपाय शोधत बिबवणे-मांगेलीवाडी (ता. कुडाळ) येथील सद्गुरू व अष्टविनायक स्वयंसहाय्यता समूहांनी एकीच्या बळावर सामूहिक शेती फुलविली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून मे २०१६ मध्ये हे दोन्ही गट स्थापन झाले. अभियानातून या स्वयंसहाय्यता समूहातील सदस्यांनी स्फूर्ती घेतली. तीन महिन्यांत केलेल्या बचतीच्या रकमेतून दोन्ही गटांनी शेतीत नंदनवन फुलविण्याचा केलेला प्रयत्न जिल्ह्यातील इतर स्वयंसहाय्यता समूहांना प्रेरणादायी आहे. जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूहांनी या धर्तीवर सामूहिक शेती व भाजीपाला लागवड केल्यास कित्येक एकर पडीक जमीन लागवडीखाली येऊ शकते.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून बिबवणे-मांगलेवाडी येथील महिला संघटित झाल्या. अभियानातून स्वयंसहाय्यता समूह स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली. त्यातून दोन स्वयंसहाय्यता समूह गठीत झाले. सद्गुरू समूहात कुंदा अरविंद अडसुळे, वैष्णवी विश्वास कोंडुरकर, सायली सतीश मांजरेकर, दिव्या दीपक सावंत, हर्षदा हेमंत कोंडुरकर, चारूशीला चंद्रकांत कोंडुरकर, वर्षा विलास सावंत, साक्षी समीर सावंत, मनीषा मनोहर कोंडुरकर, वैशाली वसंत सावंत, सुविधा समीर सावंत, शालिनी कृष्णा बिबवणेकर, सुगंधा सुरेश सावंत, संजना सुनील सावंत, सरिता पुंडलिक गवळी या पंधरा महिला एकत्रित आल्या. त्यांनी अभियानातील साप्ताहिक बैठका सुरू केल्या.
तसेच अष्टविनायक समूहात रसिका राघोबा कोंडुरकर, रोहिणी चंद्रकांत तुळसकर, अनिता अनिल सावंत, रंजना रमेश कोंडुरकर, श्रद्धा शरद सावंत, उज्ज्वला उत्तम कोंडुरकर, अमृता अंकुश कोंडुरकर, उज्ज्वला विजय कोंडुरकर, छाया सदानंद सावंत, काशीबाई मोहन सावंत या दहा महिला एकत्रित आल्या. दोन्ही समूहांनी बचत सुरू केली. आठवडा बैठकीतून विचारांचे आदान-प्रदान सुरू झाले आणि सामूहिक शेतीची संकल्पना बैठकीत रूजली. जागेचा प्रश्न होता. मात्र, ‘इच्छा तिथे मार्ग’ असल्याने समूहांनी यावर मात केली. प्रयत्न केले आणि सुभाष धुरी व अरविंद चव्हाण यांची जमीन खंडाने करण्याचे ठरले. जमीनमालकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत स्वयंसहाय्यता समूहांच्या प्रयत्नांना हातभार लावला.
शेतीची मशागत सुरू झाली. बचतीसाठी गोळा झालेले हात शेतात राबू लागले. श्रमदानातून महिलांनीच जमिनीची मशागत सुरू केली. पद्मिनी जातीच्या काकडीचे बियाणे लावले. फवारणी केली. मशागत केली. सद्गुरू समूहाने अडीच गुंठे जमिनीवर काकडी आणि १५ गुंठे जमिनीवर भातशेती केली. अष्टविनायक समूहाने ५ गुंठे क्षेत्रावर गोल्डन मुळा आणि लाल भाजीची लागवड केली. आता त्यांच्या श्रमाला फळ झाले आहे.
सद्गुरू समूहाला सर्व खर्च वजा जाता पहिल्याच प्रयत्नात किमान पाच हजार रुपये निव्वळ उत्पन्नाची अपेक्षा आहे. अष्टविनायक समूहही उत्पन्नाच्या बाबतीत आशावादी आहे. आकड्यांमध्ये उत्पन्न किती मिळाले, यापेक्षा समूह सामूहिक शेतीतून पडीक जमीन लागवडीखाली आणू शकतो आणि किफायतशीर उत्पन्नही मिळवू शकतो, हा विश्वास मिळाला.
विश्वासाचा हा ठेवा अभियानाला आणि समूहालाही उमेद देणारा आहे. दोन्ही समूहांना अभियानातून गटविकास अधिकारी व्ही. एन. नाईक, विस्तार अधिकारी एन. पी. नानचे, प्रभाग समन्वयक ओंकार तुळसुलकर यांचे मार्गदर्शन लाभले. मांगलेवाडीतील या समूहांचे प्रकल्प संचालक सुनील रेडकर, अभियानाचे जिल्हा समन्वयक देविदास नारनवरे, प्रसाद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फिरत्या निधीचे प्रस्ताव सादर आहेत. दशसूत्री प्रशिक्षण दिले आहे. यापुढील काळात उपजीविकेची साधने अधिक बळकट करण्याचा या समूहांचा प्रयत्न आहे. एखाद्या वाडीने, वस्तीने ठरविले तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय बिबवणे येथील अष्टविनायक व सद्गुरू समूहांनी दाखवून दिला आहे
बिबविणेतील महिला बचतगटांची कामगिरी नावीन्याची, आदर्शवत अशी ठरली आहे. घरबसल्या महिलांनी गावातीलच शेतीत राबून उत्पन्नवाढीसाठी सकारात्मक प्रयत्न केल्याने त्यांचा आर्थिक विकास तर झालाच, पण त्याचबरोबर शेती करण्याची प्रेरणाही त्यांना मिळाली आहे.
- कुंदा अडसुळे, अध्यक्षा,
सद्गुरू महिला स्वयंसहाय्यता बचत गट
महिला बचतगटाच्या चळवळीने जिल्ह्यातील महिला मोठ्या प्रमाणात सक्षम झाल्या आहेत. शिवाय महिलांना हक्काचा रोजगार निर्माण झाला असून, त्यांची आर्थिक उन्नतीही झाली आहे. त्यामुळे महिला बचतगटांमुळे ग्रामीण भागातील संसारांना प्रगतीची दिशा मिळाली आहे. आमच्या दोन्ही गटांच्या परस्पर सहकार्याने याचीच प्रचिती येत आहे.
- रसिका कोंडुरकर, अध्यक्षा,
अष्टविनायक महिला स्वयंसहाय्यता बचतगट