साळिस्ते येथील अपघातात एक ठार

By admin | Published: October 30, 2016 11:00 PM2016-10-30T23:00:23+5:302016-10-30T23:00:23+5:30

कंटेनर-दुचाकीमध्ये धडक : दोन्ही वाहनांचे नुकसान

One killed in an accident in Saliste | साळिस्ते येथील अपघातात एक ठार

साळिस्ते येथील अपघातात एक ठार

Next

नांदगाव : मुंबई-गोवा महामार्गावर साळिस्ते ढाब्यानजीक मालवाहतूक करणारा फिशरीज कंटेनर व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार परशुराम दामू राठोड (वय ५५) ठार झाले. यावेळी कंटेनरचालक धडक देऊन पळून जात असताना तळेरे येथील ग्रामस्थांनी त्याचा मार्ग अडवत फिशरीज कंटेनरसह त्याला पकडले. हा अपघात रविवारी सकाळी ११.३० वाजता घडला.
रविवारी लक्ष्मीपूजन असल्याने सर्वत्र खरेदीचा व दुकानदारांचा महत्त्वाचा दिवस होता. मूळ जालना येथील व सध्या कासार्डे बंडवाडी येथे राहणारे परशुराम दामू राठोड हे तळेरे येथे बाजारासाठी आले होते. व्यवसायाने सेंट्रिंग काँट्रॅक्टर असणारे राठोड आपल्या मित्रांसह दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात आले होते. बाजार आटोपल्यानंतर ते तळेरे येथून साळिस्ते येथे आपल्या दुचाकीवरून कामाच्या ठिकाणी जात होते. याचवेळी आदित्य गोहएन (२५, रा. काकोपटेर, टिनसुकाई, आसाम) हा खेड ते गोवाच्या दिशेने फिशरीज कंटेनर घेऊन जात असताना साळिस्ते ढाब्यानजीक आला असता समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचालक राठोड फिशरीज कंटेनरवर आपटल्यानंतर त्याच्या दुचाकीचे नुकसान झालेच तसेच फिशरीज कंटेनरचा पुढील भाग तुटून समोरील काच फुटली. यात परशुराम राठोड यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णवाहिकेने नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याच दरम्यान, फिशरीज कंटेनरचालक कंटेनरसह पळून जात असताना ग्रामस्थांनी त्याला अडवत जाब विचारला व कासार्डे दूरक्षेत्राचे गणेश भोवड यांच्या ताब्यात दिले. मात्र, ऐन दिवाळी सण साजरा होत असताना लक्ष्मीपूजनादिवशीच राठोड कुटुंबावर काळाने घाला घातल्याने मोठे संकट कोसळले.
परशुराम राठोड यांचे मूळ गाव जालना असून, ते पत्नी व मुलांसह कासार्डे बंडवाडी येथे गेली अनेक वर्षे वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे तळेरे परिसरात बरेच मित्र आहेत. तळेरे दशक्रोशीत ते सेंट्रिंग काँट्रॅक्टर म्हणून काम करत होते. यामुळे या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली.
यावेळी कंटेनरचालकास पकडण्यासाठी व मदतकार्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य बाळा जठार, तळेरेचे माजी सरपंच दिलीप तळेकर, बाळा कदम, दीपक नांदलस्कर, सरपंच प्रवीण वरुणकर, उदय बारस्कर यांनी सहकार्य केले. यावेळी कणकवली पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला व कंटेनरचालकास ताब्यात घेतले. राठोड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत. राठोड यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (वार्ताहर)
 

Web Title: One killed in an accident in Saliste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.