भात खरेदीसाठी एक लाख बारदानांची आवश्यकता; सतीश सावंत यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 02:52 PM2021-01-08T14:52:47+5:302021-01-08T14:54:33+5:30
satish sawant Minister sindhudurg- धान खरेदी हंगाम २०२०-२१ साठी सिंधुदुर्गात ४९ धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर धान खरेदी सुरू करण्यात आली आहे. मात्र, पुढील धान खरेदीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला १ लाख बारदानांची आवश्यकता आहे. शासनाकडून ही बारदाने पुरविण्यात यावीत, अशी मागणी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे.
कणकवली : धान खरेदी हंगाम २०२०-२१ साठी सिंधुदुर्गात ४९ धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर धान खरेदी सुरू करण्यात आली आहे. मात्र, पुढील धान खरेदीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला १ लाख बारदानांची आवश्यकता आहे. शासनाकडून ही बारदाने पुरविण्यात यावीत, अशी मागणी राज्याचे सहकार व पणन मंत्रीबाळासाहेब पाटील यांच्याकडे सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे.
धान खरेदीसाठी बारदाने उपलब्ध व्हावीत या मागणीसाठी सतीश सावंत यांनी बुधवारी मंत्रालयात सहकार मंत्रीबाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. सिंधुदुर्गात शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजना चालू आहे. जिल्हाधिकारी यांनी त्यासाठी ४९ धान खरेदी केंद्रे मंजूर केली आहेत. त्यापैकी ३७ केंद्रांवर धान खरेदी चालू आहे.
या ३७ केंद्रांवर नवीन ५९ हजार ५०० व दुबार वापरलेली ३९ हजार ९७५ अशा एकूण ९९ हजार ४७५ बारदानांचे वाटप झाले आहे. प्रत्यक्षात १९ धान खरेदी केंद्रावर १० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. त्यासाठी २५ हजार बारदानांचा वापर झाला आहे. उर्वरित बारदाने केंद्रांवर शिल्लक दिसत आहेत, तर पुढील धान खरेदीसाठी एक लाख बारदानांची मागणी ३० डिसेंबर रोजी करण्यात आली आहे.
वाटप केलेल्या बारदाणांमधून ऑनलाईन खरेदी पोर्टलवर पूर्ण घेण्यात आलेली नाही, त्यामुळे ७४ हजार ४७५ बारदाने शिल्लक दिसत आहेत. परंतु, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला १ लाख बारदानांची आवश्यकता आहे, अशी मागणी सतीश सावंत यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली. याविषयी पुढील कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत.