विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू, महामार्ग ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनच्या तिघांवर गुन्हा
By सुधीर राणे | Published: January 25, 2023 12:31 PM2023-01-25T12:31:42+5:302023-01-25T12:32:11+5:30
बसस्थानकासमोर सर्व्हिसरोडच्या बाजूला असलेल्या वीज खांबानजीक एक मृतदेह सापडला होता.
कणकवली: विजेच्या खांबाशी संपर्क आल्याने विजेचा तीव्र धक्का बसून बाळकृष्ण शांताराम तावडे (७०, कणकवली - टेंबवाडी) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अखेर महामार्ग ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनचे व्यवस्थापक मृत्यूंजय कुमार, इलेक्ट्रिशियन मिथिलेश कुमार आणि मनिषसिंह यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे.
शवविच्छेदन अहवालात बाळकृष्ण तावडे यांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार पथदिपाची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या बिल्डकॉनच्या तिघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत बाळकृष्ण यांची पत्नी सुहासिनी हिने तक्रार नोंदविली आहे.
याबाबत माहिती अशी, बाळकृष्ण तावडे हे २८ ऑगस्टला घरातून बाहेर पडले होते. ते उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली. ९ सप्टेंबरला पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार देण्यात आली. तत्पूर्वी २९ ऑगस्टला बसस्थानकासमोर सर्व्हिसरोडच्या बाजूला असलेल्या वीज खांबानजीक एक मृतदेह सापडला होता. तो मृतदेह बाळकृष्ण तावडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदन अहवालात बाळकृष्ण तावडे यांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी नगरसेवक शिशीर परुळेकर यांनीदेखील आवाज उठविला होता.
त्यानुसार पोलिसांनी वीज कार्यालयाशी संपर्क साधून संबधित वीज खांबाची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार वीज कार्यालयाकडून बाळकृष्ण तावडे यांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार पोलिसांनी महामार्गाचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीशी पत्र्यव्यवहार केला व पथदीपाची देखभाल, दुरुस्ती करण्याची जबाबदारी कुणाची, याची विचारणा केली होती. या चौकशीनंतर पोलिसांनी दिलीप बिल्डकॉनच्या तिघांवर संगनमताच्या हयगयीमुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ३०४ (अ), ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.