कणकवलीत एकांकिका स्पर्धा
By admin | Published: January 19, 2015 09:19 PM2015-01-19T21:19:22+5:302015-01-20T00:03:32+5:30
२४ जानेवारीपासून सुरुवात : नाथ पै संस्थेतर्फे आयोजन
कणकवली : नाथ पै एकांकिका स्पर्धेची शालेय गटाची स्पर्धा २४ ते २६ जानेवारी या कालावधित कणकवली येथे होणार आहे.
यावर्षी शालेय गटात नऊ संघांनी आपला सहभाग निश्चित केला असून, यामध्ये आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ यांची ‘झाली काय गंमत’, शिंदे अकॅडमी, कोल्हापूर यांची ‘गणपती बाप्पा हाजीर हो’, बाबा वर्दम थिएटर्स कुडाळची ‘नवे गोकुळ’, श्री आदर्श विद्यालय कोथळी, कोल्हापूरची ‘लाडूशेठ वाट्टोळा’, पूर्ण प्राथमिक शाळा कसबा वाघोटणची ‘काखेत कळसा गावाला वळसा’, आर. पी. बागवे हायस्कूल, मसुरे यांची ‘राक्षस तुमच्या घरात’, अक्षरसिंधू कलामंच कणकवलीची ‘क्लोन’, युरेका सायन्स क्लब कणकवलीची ‘आली रे आली दहावी आली’, शिरगाव हायस्कूल, शिरगाव यांची ‘कुलूप’, अशा एकांकिका सादर होणार आहेत.
नाट्यचळवळीच्या सकस वाढीसाठी संस्थेने स्पर्धेच्या स्वरूपात वेगवेगळ्या टप्प्यांवर बदल केले. जसे स्पर्धेच्या १५ व्या वर्षी ‘दिग्दर्शीय टिप्पणी’ २१ व्या वर्षी स्पर्धा ‘प्राथमिक व अंतिम फेरी’, अशा दोन स्तरावर आयोजित करणे, तर ३१ व्या वर्षी स्पर्धेचे स्वरूप बाजूला ठेवून ‘लेखककेंद्री एकांकिका महोत्सव’ घेण्यास प्रारंभ केला. हे बदल करण्यामागचा उद्देश नाट्यचळवळीचा विकास व्हावा व रसिकांना दर्जेदार कलाकृती पाहता याव्यात हाच होता. यादृष्टीने यावर्षीपासून ‘नाथ पै सरस एकांकिका स्पर्धा’ आयोजित करण्याचे संस्थेने ठरविले होते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१४ या कालावधीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या एकांकिकांची स्पर्धा घेण्याचे संस्थेने निश्चित केले. परंतु जिल्ह्यातील अथवा जिल्ह्याबाहेरील पारितोषिकप्राप्त संघांनी अंतिम तारखेपर्यंत आपला सहभाग नोंदविला नाही. क्षीण प्रतिसादामुळे खुल्या गटातील ही स्पर्धा तूर्तास रद्द करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.या कार्यक्रमाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे. (प्रतिनिधी)