‘पर्ससीन’वर एक टन मासळी

By admin | Published: December 17, 2015 12:15 AM2015-12-17T00:15:15+5:302015-12-17T01:21:25+5:30

मालवण किनारपट्टीवर घुसखोरी : एक लाख ४० हजार दंडाचा प्रस्ताव सादर

One ton of fish on 'Percena' | ‘पर्ससीन’वर एक टन मासळी

‘पर्ससीन’वर एक टन मासळी

Next

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मंगळवारी रात्री मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर्सने देवगड येथील नौकेला धडक देत पोबारा केला. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या ‘अप्सरा’ स्पीडबोटीने शोधमोहीम राबविली. त्यात मलपी येथील हायस्पीड ट्रॉलरने पळ काढला. मात्र, शोधमोहिमेदरम्यान गोवा येथील पर्ससीन ट्रॉलर्स महाराष्ट्र सागरी हद्दीत १३ वाव समुद्रात मासेमारी करताना आढळून आला. ट्रॉलर्सवर एक टन मासळी मिळाली असून, सुमारे २४ हजार किमतीच्या मासळीवर पाचपट दंडासह एक लाख ४३ हजार दंडाचा प्रस्ताव तहसील प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे.
मालवण किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स व गोवा येथील पर्ससीनने अतिक्रमण करत धुमाकूळ घातला आहे. माशांची लयलूट करताना लाखो रुपये किंमतीच्या मच्छिमार जाळ्यांचे नुकसान केले जात आहे. मंगळवारी रात्री गोपीनाथ तांडेल, लक्ष्मण खडपकर, पुंडलिक शेलटकर यांच्या प्रत्येकी २० हजार किंमत असलेली २५ ते ३० जाळी तुटल्याने ,सुमारे चार लाखाहून अधिक नुकसान झाले
आहे.
मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर्सने देवगड येथील नौकेला धडक दिल्यानंतर मलपी हायस्पीडना पकडण्यासाठी मालवण पोलीस निरीक्षक शंकर पाटील, मत्स्य अधिकारी सुरेंद्र गावडे, पोलीस उपनिरीक्षक पी. के. सारंग हे ‘अप्सरा’ बोटीने शोधमोहीम घेत असताना हायस्पीड ट्रॉलर्सने पळ काढला. मात्र, गोवा पणजी येथील जॉस निकोलो कोईला यांचा ‘गोल्डन सी २’ हा पर्ससीन ट्रॉलर्स मासेमारी करताना सापडून आला. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास या ट्रॉलर्सला मालवण बंदरात आणण्यात आले.
दरम्यान, पर्ससीन आणि पारंपरिक मच्छिमारांमधील हा संघर्ष आता चांगलाच पेटला आहे. पर्ससीन मच्छिमारांकडून सरसकट मच्छिमारी केली जात असल्याने पारंपरिक मच्छिमारीवर त्याचा मोठा परिणाम जाणवत असल्याचे पारंपरिक मच्छिमारांचे म्हणणे आहे. त्यातून हा वाद उद्भवला आहे.
हा प्रश्न आता विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही उपस्थित झाल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)



शंकर पाटील : कायदा हातात घेऊ नका.
जाळ्यांचे लाखोंचे नुकसान
सर्जेकोट येथील गिलनेटधारक व ट्रॉलर्स मालक यांच्या जाळ्याचे हायस्पीड ट्रॉलर्सकडून मोठे नुकसान होत आहे. याबाबत सर्जेकोट येथील गोपीनाथ तांडेल, महेश देसाई, बाळा धुरी, आबा सावंत, दाजी खडपकर, पुंडलिक शेलटकर यांनी मालवण पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. हायस्पीड ट्रॉलर्सकडून जाळ्यांचे नुकसान झाले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी तुम्ही कायदा हातात घेऊ नका. परप्रांतीय व अनधिकृत मासेमारीच्या विरोधात दिवसरात्र कारवाईसाठी पोलीस यंत्रणा मत्स्य विभागासोबत असल्याचे सांगितले. यावेळी गोपीनाथ तांडेल यांनी जाळ्यांच्या नुकसानीची तक्रार नोंदवली आहे.

तोडगा निघणार
बुधवारी शिवसेनेच्या आमदारांनी नागपूर येथे सुरु असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. त्याबाबत तत्काळ निर्णय घेण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली.

पंचनाम्यात बांगडा, सुरमई, पेड, लालमी, टोळ आदी प्रकारची एक टन मासळी सापडून आली.
याबाबत कारवाई प्रस्ताव मालवण तहसीलदार वनिता पाटील यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.
याची सरासरी किंमत २३ हजार ८५० करण्यात आली.
हायस्पीड ट्रॉलर्सचा धुमाकूळ : मच्छिमारांच्या जाळ्यांचे लाखोंचे नुकसान.
पाचपट दंड अधिक मासळीची किमंत असा सुमारे एक लाख ४३ हजार दंड होण्याची शक्यता आहे, अशी माहिती परवाना अधिकारी सुरेंद्र गावडे यांनी दिली.
पकडण्यात आलेल्या गोवा पर्ससीनवर एक टन मासळी सापडली.
१ लाख ४० हजार दंडाचा प्रस्ताव तहसीलदारांना सादर.
२५ ते ३० जाळी तुटल्याने चार लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज.

Web Title: One ton of fish on 'Percena'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.