कांद्याने आणले डोळ्यांत पाणी, फोडणी महागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 03:47 PM2019-12-13T15:47:34+5:302019-12-13T15:48:36+5:30
कांद्याच्या झालेल्या नुकसानीचा परिणाम कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्गात घाऊक आणि किरकोळ बाजारात पहायला मिळत आहे. कांदे खराब झाल्याने व साठवून ठेवलेला कांदा शिल्लक नसल्याने बाजारात मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे दर १०० ते १३० रुपये किलोच्या घरात गेले. यामुळे सामान्य नागरिकांच्या जेवणाची चव महागली असून कांद्याने गृहिणींच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.
कणकवली : कांद्याच्या झालेल्या नुकसानीचा परिणाम कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्गात घाऊक आणि किरकोळ बाजारात पहायला मिळत आहे. कांदे खराब झाल्याने व साठवून ठेवलेला कांदा शिल्लक नसल्याने बाजारात मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे दर १०० ते १३० रुपये किलोच्या घरात गेले. यामुळे सामान्य नागरिकांच्या जेवणाची चव महागली असून कांद्याने गृहिणींच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.
शेतकऱ्यांकडे आता चांगला कांदाही नसल्याने बाजारात कांद्याची टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, परतीचा पाऊस थंडावला असला तरी पिकांची नासधूस झाल्याने बळीराजा संकटात सापडला होता. यामुळे कांद्याचे उत्पादन घटले असल्याने बाजारपेठेत मागणी वाढली आहे. परिणामी घाऊक बाजारात कांद्याची घसरण झाली असली. तरी सामान्य नागरिकांना कांदा महाग मिळणार आहे.
साधारण १०० ते १३० रुपये किलो दराने कांदा विक्री कणकवली बाजारपेठेमध्ये होत आहे. शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा पावसामुळे खराब झाल्याने अगदी काही कांदा शिल्लक असल्याने आवकही घटली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कांदा रडवणार असल्याची शक्यता दिसून येत आहे.