सत्ताधाऱ्यांना कांदा रडविणार : उपरकर, जनता कंटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 04:41 PM2019-09-27T16:41:47+5:302019-09-27T16:44:01+5:30
केंद्र व राज्यातील सरकार बँक घोटाळे करून पळून जाणाऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे बेकारी, महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली असून सर्वसामान्य गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणत असलेला कांदाच सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत रडवेल, असा टोला मनसे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.
मालवण : केंद्र व राज्यातील सरकार बँक घोटाळे करून पळून जाणाऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे बेकारी, महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली असून सर्वसामान्य गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणत असलेला कांदाच सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत रडवेल, असा टोला मनसे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.
मालवण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शैलेश अंधारी, तालुकाध्यक्ष विनोद सांडव, गुरू तोडणकर, विल्सन गिरकर, भारती वाघ, आबा आडकर, राजू गिरकर, बापू तोडणकर, सुनील हिंदळेकर आदी उपस्थित होते.
भविष्यात शिवसेनेची सत्ता येईल आणि आपल्याला सर्व ठेके मिळतील, या आशेने स्वाभिमानच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, याच सत्ताधाऱ्यांची कार्यपद्धती पाहून मतदार राजा आता त्यांच्या पारड्यात मते टाकणार नाही, अशी टीकाही उपरकर यांनी केली.
उपरकर म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीत नारायण राणेंना कंटाळून नकारात्मक भावनेतून शिवसेनेला मतदान केले. मात्र, आमदार वैभव नाईकांच्या पाच वर्षांतील कार्यपद्धतीची नौटंकी मतदारसंघातील जनतेने पाहिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधी मतदान जनता करणार आहे. त्यामुळे कुडाळ-मालवण मतदारसंघात मनसे ताकदीनिशी उतरणार आहे. सत्ताधाऱ्यांचे कारभार लोकांसमोर मांडणार आहे.
रविवार २९ सप्टेंबर रोजी कुंभारमाठ येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे उपरकर यांनी सांगितले.