अवघ्या दहा रुपयांत पोळीभाजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2016 11:27 PM2016-04-05T23:27:07+5:302016-04-06T00:14:54+5:30

अ‍ॅड. रूची महाजनी : ‘शिवप्रसाद महाजनी फाऊंडेशन’तर्फे गुढीपाडव्यापासून ‘रामरोटी’ उपक्रम

Only 10 rupees worth of money! | अवघ्या दहा रुपयांत पोळीभाजी!

अवघ्या दहा रुपयांत पोळीभाजी!

Next

रत्नागिरीतील प्रसिध्द वकील शिवप्रसाद महाजनी यांची प्रसन्न व्यक्तिमत्व, आनंदी, मनमिळावू आणि सहकार्याला सदैव धावून जाणारे व्यक्तिमत्व अशी ओळख होती. प्रत्येकाला आपलेसे करण्याची उत्कृष्ट हातोटी त्यांच्याकडे होती. २९ जुलै २०१२ रोजी त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पत्नी अ‍ॅड. रूची महाजनी यांनी आपल्या पतीच्या स्मृती जतन करण्यासाठी आपला परिवार आणि आपले पती यांच्यासारखीच जीव तोडून काम करणारी मित्रमंडळी यांच्या सहकार्याने शिवप्रसाद महाजनी फाऊंडेशनची स्थापना केली. आज या फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. यापैकीच एक ‘रामरोटी’ उपक्रम! जिल्हा रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांसाठी दहा रुपयांत पोळी, भाजी देण्यात येणार आहे. हा उपक्रम गुढीपाडव्यापासून सुरू होणार आहे. याविषयी अ‍ॅड. महाजनी यांच्याशी केलेली बातचित.
प्रश्न : शिवप्रसाद फाऊंडेशनची स्थापना करण्यामागचा उद्देश काय?
उत्तर : समाजासाठी काहीतरी करायला हवं, यासाठी अ‍ॅड. शिवप्रसाद महाजनी यांची तळमळ होती, त्यांची ही इच्छा पूर्ण करावी, या हेतूने २३ जुलै २०१३ रोजी ‘शिवप्रसाद महाजनी फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात आली. सध्या या फाऊंडेशनच्या माध्यमातून रत्नागिरीतील विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्याभ्यास शिष्यवृत्ती तसेच शेवटच्या वर्षी होणाऱ्या परीक्षेत पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षीस देण्यात येते. वकिली व्यवसायातील करिअरच्या मार्गदर्शनासाठी दरवर्षी बाहेरील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात, यासाठी अ‍ॅड. विलास पाटणे, अ‍ॅड. राजशेखर मलुष्टे यांचे सहकार्यही लाभते. तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य आठ दिवसांचे योगा शिबिर आयोजित करण्यात येते. रक्तदान शिबिरे आदी उपक्रम राबवण्यात येतात. तीन वर्षांपासून रूग्णोपयोगी साहित्य केंद्र चालवले जाते.
प्रश्न : ‘रामरोटी’ उपक्रमामागची संकल्पना आणि स्वरूप काय आहे?
उत्तर : जिल्हा रुग्णालयात विविध भागातून विशेषत: ग्रामीण भागातून रूग्ण येतात. त्यातील बहुतांश गरीब असल्याने त्यांच्या नातेवाईकांना एक वेळचे जेवणही परवडत नाही. त्यामुळे ते वडापाव, मिसळपाव असं खाऊन दिवस काढतात. अशा गरजू रूग्णांच्या नातेवाईकांना नाममात्र १० रुपयांत ३ पोळ्या आणि भाजी पुरविली जाणार आहे. जिल्हा रूग्णालयात दरदिवशी सुमारे २५० रूग्ण दाखल होतात, हे लक्षात घेऊन दर दिवशी २०० पाकिटे पुरविण्याचा मानस आहे.
प्रश्न : हा उपक्रम राबवावा, असे का वाटले?
उत्तर : आमचे एक सत्संगी पक्षकार आहेत. अ‍ॅड. शिवप्रसाद गेल्यानंतर एकदा ते माझ्याकडे आले. त्यांनी मला ‘जीने का मकसद क्या है?’ असा प्रश्न विचारला. मी आमच्या फाऊंडेशनच्या उपक्रमाबद्दल सांगितले. त्यावर त्यांनी अन्नदानाचा उपक्रम का राबवत नाही, असे विचारले आणि यावर रेल्वे स्टेशनसारख्या ठिकाणी अन्नदान करण्याविषयी सुचविले. यावर विचार केल्यावर असं वाटल - फुकट अन्नदान केले तर आपण भिकाऱ्यांची संख्या वाढवू. त्यापेक्षा ज्यांना गरज आहे, त्यांच्याकरिता हा उपक्रम राबवावा. त्यातून मग जिल्हा रूग्णालयातील गरजू रूग्णांच्या नातेवाईकांची अडचण लक्षात घेऊन त्यांच्यासाठी असा एखादा उपक्रम राबवण्याची कल्पना पुढे आली, ती म्हणजे ‘रामरोटी’.
प्रश्न : हा खर्च कसा उचलणार आहात?
उत्तर : या उपक्रमासाठी महत्त्वाची मदत होणार आहे ती मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूरदेसाई आणि कौस्तुभ सावंत यांची! नफा नाही उलट तोटाच पत्करून ही मंडळी जाग्यावर दरदिवशी पोळी भाजीची २०० पाकिटे उपलब्ध करून देणार आहेत. या मंडळींचा आर्थिक हात मिळाला नसता तर फाऊंडेशनला हा उपक्रम राबवणे अवघड गेले असते.
प्रश्न : रूग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यामागचा उद्देश काय?
उत्तर : बहुतांश रूग्णांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर त्यांना ठराविक कालावधीत आवश्यक असणारे साहित्य खरेदी करणे अवघड जाते. त्यामुळे अल्प अशा दिवसाला १ रुपया भाडेतत्त्वावर एअरबेड, फोल्डिंग बेड, वॉटरबेड, कमोड चेअर, वॉकर, व्हीलचेअर अशा साधनांचा पुरवठा केल्यास त्यांना मदत होईल, या हेतूने रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे या केंद्राची सुरुवात केली. ही संकल्पना आमचेच एक सहकारी अ‍ॅड. प्रशांत पाध्ये यांची. आता या केंद्राला भरघोस प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे दरवर्षी २८ आॅगस्ट या अ‍ॅड. शिवप्रसाद यांच्या वाढदिनी आम्ही दहा-दहा वस्तू वाढवितो. या सर्व साधनांची आवश्यक दुरूस्तीही आम्हीच करतो. या केंद्राचा कार्यभार सांभाळणारे कारेकर कुठलाही मोबदला घेत नाहीत.
प्रश्न : फाऊंडेशनला या सामाजिक उपक्रमांसाठी कुणाची आर्थिक मदत?
उत्तर : अ‍ॅड. शिवप्रसाद महाजनी यांची रिक्षावाले, टपरीवाले ते अगदी वरिष्ठ स्तरावरील अधिकारी अशा सर्वांशीच आर्थिक, जातीय अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता मैत्री होती. कुणीही बोलावले तरी ते मदतीला धावून जायचे. या गुणामुळे त्यांचा लोकसंपर्कही प्रचंड होता. म्हणूनच त्यांनी जे पेरलं, त्याची चांगली फळं आम्हाला या फाऊंडेशनच्या रूपाने मिळाली आहेत. म्हणूनच त्यांचे सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी स्थापन केलेल्या या ‘शिवप्रसाद महाजनी फाऊंडेशन’च्या सर्व उपक्रमांना आर्थिक हात देण्यासाठी देणगीदार स्वत:हून पुढे येत आहेत. त्याचबरोबर आमच्या घरची मंडळी आणि कार्यालयीन सहकारी यांचीही तितकीच मोलाची मदत या कार्याला होतेय, हे आवर्जुन नमूद करायलाच हवे. येत्या गुढीपाडव्याला ‘रामरोटी’ उपक्रम सुरू होतोय. २००० रुपये एवढा एका दिवसाचा ‘रामरोटी’चा भार उचलून नागरिकांनाही या अन्नदानाच्या कार्यात सहभागी होता येईल. समाजाकडून असा हातभार मिळाल्यास प्रेरणा आणि बळ मिळेल.
- शोभना कांबळे

Web Title: Only 10 rupees worth of money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.