सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचा फक्त ५० टक्केच निधी खर्च !, राजन तेली यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 02:37 PM2022-03-16T14:37:19+5:302022-03-16T14:37:42+5:30

पालकमंत्री उदय सामंत यांचा प्रशासनावर अंकुश नसल्यानेच ही परिस्थिती उदभवली

Only 50% of Sindhudurg district planning funds spent, Rajan Teli alleges | सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचा फक्त ५० टक्केच निधी खर्च !, राजन तेली यांचा आरोप

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचा फक्त ५० टक्केच निधी खर्च !, राजन तेली यांचा आरोप

Next

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या १७० कोटी पैकी आतापर्यंत फक्त ५० टक्केच म्हणजे केवळ ८८ कोटी रुपयेच खर्च झाला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांचा प्रशासनावर अंकुश नसल्यानेच ही परिस्थिती उदभवली आहे.

स्थानिक विकास कार्यक्रमाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मार्च महिन्याचे पंधरा दिवस संपले असून ही मंजुरी केव्हा मिळणार? जिल्हा प्रशासनाचा ढिसाळ कारभार यावरून दिसून येत आहे.मार्च अखेर पर्यत हा निधी खर्च न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन भाजपच्यावतीने  करण्यात येईल. असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला आहे. कणकवली येथील भाजप जिल्हा कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तेली म्हणाले, आता होळी सण येत आहे. कोकणात होळी सणाला येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी अडचण झाली आहे.एसटी कामगारांचा  संप सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे बस अभावी हाल होत आहेत. त्याला परिवहन मंत्री अनिल परब जबाबदार आहेत. याबाबत मंगळवार पर्यंत न्याय न मिळाल्यास भाजप विधिमंडळात आवाज उठवणार आहे.

सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले अनिल परब मंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातील एसटी बसस्थानक व अन्य कामे  व्यवस्थितरित्या होतील. अशी अपेक्षा होती. मात्र, कोकणी जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. आता होळीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवास करताना वारेमाप पैसे द्यावे लागत आहेत. अनेक खासगी बसवाले त्यांची लूट करत आहेत. मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. संपकरी लोकांना थांबवण्यासाठी शासनाला कुठल्याही प्रकारचे यश आलेले नाही. उत्तरप्रदेश मध्ये परिवहन सेवा फायदेशीर ठरत आहे. मग आपल्या राज्यात नेमकी गळती कुठे लागली आहे? गोंधळ कुठे सुरू आहे? याची सखोल चौकशी व्हायला हवी.

एसटी बसस्थानके नुतनीकरण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात निधी देण्यात आला होता. ती कामे या सरकारने ठप्प केली आहेत. जिल्ह्यातील बसस्थानकांची अवस्था बिकट आहे. कणकवली, मालवण,सावंतवाडी या बसस्थानकांची अवस्था वाईट आहे.
त्यामुळे पुढील काळात आम्ही तिव्र आंदोलन करणार आहोत. कुंभवडे व अन्य छोटी धरणे झाली आहेत. पण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे जलसंधारण विभागाच्या विरोधातही आम्ही आंदोलन करणार आहोत. ज्या ठिकाणी भूसंपादन न करता कामे चालू केली, त्या विरोधात आंदोलन आम्ही करणार असल्याचा इशारा राजन तेली यांनी यावेळी दिला.

Web Title: Only 50% of Sindhudurg district planning funds spent, Rajan Teli alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.