पालकमंत्र्यांकडून निधी आणल्याच्या केवळ घोषणाच, परशुराम उपरकरांचा आरोप
By सुधीर राणे | Published: July 1, 2023 03:55 PM2023-07-01T15:55:54+5:302023-07-01T15:56:17+5:30
जिल्ह्याचे सुपूत्र असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री व शिक्षणमंत्री या दोन्ही मंत्र्यांचे जिल्ह्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष
कणकवली : राज्याचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण हे जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून मिळाले तरी विकासात फरक पडलेला नाही. राज्यातील सरकारला वर्ष झाले तरी सार्वजनिक बांधकामच्या कार्यपद्धतीत कोणताच फरक पडला नाही. पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. पालकमंत्र्यांचे जिल्ह्याकडे लक्ष नसून निधी आणल्याच्या ते केवळ घोषणाच करत असल्याची टीका मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उपरकर म्हणाले, ज्या रस्त्यांना वर्षभरात किंवा वॉरटी कालावधीत खड्डे पडतात, त्याबाबत जाब विचारणाऱ्यांना समाजकंटक म्हणून हिनवणे मनसे खपवून घेणार नाही. रस्त्यांच्या कामाच्या दर्जा बाबतच्या माहितीसाठी थेट जनतेचा सहभाग असावा यासाठी तांत्रिक सल्लागारांच्या कार्यशाळा मनसेमार्फत घेणार असल्याचेही उपरकर यांनी सांगितले.
सुपूत्रांचे दुर्लक्ष
जिल्ह्याचे सुपूत्र असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री व शिक्षणमंत्री या दोन्ही मंत्र्यांचे जिल्ह्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष झालेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदारांनी केलेल्या कामाच्या बिलांसाठीचा निधीही हे मंत्री देऊ शकले नाहीत, हे ठेकेदारांच्या भेटीतून उघड झाले. मात्र, ठेकेदार व अधिकारी हे पैसे यावेत म्हणून गेले होते की 'कट' ठरविण्यासाठी गेले होते? असा सवाल करत जिल्ह्यातील रस्त्यांच्या स्थितीकडे मनसे लक्ष ठेऊन आहे.
पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे
सिंधुदुर्गात खड्डेमुक्त रस्त्यांची पोकळ घोषणा सत्ताधारी करतात. मात्र अवघ्या ८ दिवसात नवीन बनवलेल्या रस्त्यांवर सुद्धा खड्डे पडू लागलेले आहेत. आंगणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर १४ कोटींचा निधी खर्च झाला. मात्र पहिल्याच पावसात या रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावरून एकेरी वाहतूक करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यानी दिलेले होते, त्याचे काय झाले? गणेशोत्सवापूर्वी पुन्हा चार दिवस खड्डेमुक्तीची घोषणा होईल असेही ते म्हणाले.