एकमेव सेलिब्रिटीही मतदारांनी नाकारला-- राजापूर लोकसभा मतदारसंघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:16 PM2019-04-10T12:16:06+5:302019-04-10T12:18:07+5:30
नाट्य-चित्रपटातील सेलिब्रिटी आणि राजकारण यांचे नाते खूप जुने आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असाच एक प्रयोग १९९८ साली करण्यात आला.
रत्नागिरी : नाट्य-चित्रपटातील सेलिब्रिटी आणि राजकारण यांचे नाते खूप जुने आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असाच एक प्रयोग १९९८ साली करण्यात आला. मालवणी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाºया मच्छिंद्र कांबळी यांनी राजापूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. मात्र, हा एकमेव सेलिब्रिटीही मतदारांनी नाकारला.
राजकीय पदे, त्यातील मानमरातब, त्यातून मिळणारे अधिकार याचे आकर्षण सेलिब्रिटिंना असते आणि अशा सेलिब्रिटींची लोकप्रियता राजकीय पक्षांना आकर्षित करते. त्यामुळे अभिनेते-अभिनेत्रींना राजकीय रिंगणात उतरवण्याचा खेळ जुनाच आहे. दक्षिणेकडील भागात हे प्रमाण अधिक आहे.
वर्षानुवर्षे बॅ. नाथ पै, मधु दंडवते यांच्या पाठीशी ठाम उभ्या राहणाºया राजापूर लोकसभा मतदार संघात सेलिब्रिटिला उतरवण्याचा मोह काँग्रेसला झाला आणि त्यातूनच मच्छिंद्र कांबळी यांचे नाव पुढे आले. ‘वस्त्रहरण’च्या माध्यमातून मालवणी भाषेला वलय मिळवून देणारे नाट्य-सिने अभिनेते, निर्माते म्हणून मच्छिंद्र कांबळी यांचे नाव आजही घेतले जाते. काँग्रेसने १९९८ साली त्यांना राजापूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजवर निवडणूक लढवलेला हा एकमेव सेलिब्रिटी. त्यावेळी त्यांच्यासमोर शिवसेनेकडून तत्कालिन खासदार सुरेश प्रभू तर पुष्पसेन सावंत (जनता दल), नलिनी भुवड आणि किरण ठाकूर (दोन्ही अपक्ष) असे तीन उमेदवार रिंगणात होते. मात्र, मुख्य लढत झाली ती कांबळी आणि प्रभू यांच्यामध्येच. त्यात कांबळी यांना १ लाख ५२ हजार ७२४ मते मिळाली. यावेळी २ लाख १७ हजार ७६६ मते मिळालेले सुरेश प्रभू विजयी झाले.
एकदाच झाला प्रयोग
कोकणातील अनेक कलाकार नाट्य-सिने क्षेत्रात प्रसिद्धीच्या झोतात आहेत. मात्र, एकदा झालेला प्रयोग फसल्यानंतर पुन्हा हा प्रयोग कोणीही केला नाही. कोकणातील मतदारांनी आजवर पक्ष पाहूनच मतदान केल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. कांबळी यांच्या निवडणुकीतही तेच अधोरेखित झाले होते.