पालकमंत्र्यांचाच अनेक गावांवर अन्याय
By admin | Published: October 15, 2015 12:10 AM2015-10-15T00:10:51+5:302015-10-15T00:53:18+5:30
काका कुडाळकर यांचा आरोप : पर्यटन विकास आराखड्यातून भाजपलाही वगळले
कुडाळ : जिल्ह्यातील काही गावांचा पर्यटनदृष्ट्या विकास करताना पालकमंत्र्यांनी अनेक गावांवर अन्याय केला आहे. तसेच ही गावे ठरविण्याच्या बैठकीला भाजप पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी विश्वासात घेतले नाही, असे आरोप भाजपचे काका कुडाळकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर प्रसिद्धीपत्रकातून केले आहेत.कुडाळकर यांनी म्हटले आहे की, भाजपचे नेते व राज्याचे राज्यमंत्री रामराजे शिंदे यांनी ६ आॅक्टोबरला बोलाविलेल्या बैठकीनुसार काही गावांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती. ही बैठक भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिलेल्या पत्रानुसारच घेण्यात आली होती. असे असताना जिल्ह्यातील काही गावांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ज्या गावांची निवड केली आहे, ती पाहता त्यांनी बऱ्याच गावांवर अन्याय केल्याचे चित्र दिसत आहे. राज्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या या संदर्भातील बैठकीत जिल्ह्याचा पर्यटन विकासाचा आराखडा कसा असावा, याबाबत चर्चा व निर्णय झाले. त्यामुळे याबाबत या बैठकीला पालकमंत्र्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले पाहिजे होते. मात्र, त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचे कुडाळकर यांनी म्हटले आहे. कुडाळ हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून या तालुक्यातील १७ गावांची निवड झाली. मात्र, कुडाळ शहराचा पर्यटन विकास आराखड्यात समावेश नसल्याने काका कुडाळकर यांनी खेद व्यक्त केला आहे. कुडाळ हे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शहर आहे. येथे भुईकोट किल्ला आहे. घोडेबाव, साई मंदिर, श्री देव कुडाळेश्वर मंदिर, भंगसाळ नदी येथील पांडवकालीन घाट, देवाचा डोंगर तसेच इतरही पर्यटनदृष्ट्या आवश्यक अशी ठिकाणे आहेत. तसेच रेल्वेस्थानक, चिपी विमानतळही जवळ आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे हे शहर पर्यटन विकास आराखड्यात सामील करावे, अशी विनंती पालकमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)
आम्ही निधी आणणार
या जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे कुडाळ शहर नव्हे, तर या जिल्ह्यातील जी गावे पर्यटनदृष्ट्या विकसित होणे गरजेचे आहेत, त्यांचे प्रस्ताव तयार करून भाजपचे नेते विनोद तावडे व रामराजे शिंदे यांच्यामार्फत आम्ही निधी आणणार, असा निर्धारही कुडाळकर यांनी केला.