‘त्या’ला केवळ झोपड्या बांधण्याचा शौक
By admin | Published: February 8, 2016 10:23 PM2016-02-08T22:23:34+5:302016-02-08T23:50:37+5:30
राजापूर तालुका : डोंगर गावातील वृद्धाचा जगावेगळा छंद; गेल्या २० वर्षात ५०हून अधिक झोपड्यांची उभारणी
विनोद पवार -- राजापूर --कोणी काडेपेट्या जमवतं, कुणी पोस्टाची तिकिटं जमवतं तर कुणी जुनी नाणी जमवतं. प्रत्येकाला काही ना काही छंद असतोच. पण, रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील डोंगर गावातील एका वृद्धाचा छंद जगावेगळाच आहे. मोकळ्या माळरानावर कातळ जमिनीवर एकामागोमाग एक झोपड्या बांधण्याचा अनोखा छंद या अवलियाने जोपासला आहे. कदाचित वेडेपणा वाटावा, अशा या कृतीमागचे कारण ते कोणाला सांगत नाहीत. गावकऱ्यांनाही ते कोडंच आहे. पण, गेल्या २0 वर्षात ५0हून अधिक झोपड्या बांधून या अवलियाने आपला छंद पुढे सुरूच ठेवला आहे. राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या! या संत तुकडोजी महाराजांच्या उक्तीची आठवण हा अवलिया करून देतो.
सीताराम नारायण जोगले असे नाव असलेला हा डोंगर दत्तवाडीतील अवलिया सुमारे ६५ वर्षांचा आहे. एक किंवा दोन माणसं राहू शकतील, अशा झोपड्या बांधून त्यांना काय साधायचं आहे, या झोपड्या ते नक्की कशासाठी आणि कोणासाठी बांधतात, यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरीत असल्याने सीताराम जोगले आणि त्यांनी बांधलेल्या झोपड्या हे दोन्ही विषय कुतुहलाचे झाले आहेत.
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा,कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या!संत तुकडोजी महाराजांच्या ओळी या अवलियाला अगदी सार्थ ठरतात. गेल्या वीस वर्षात कातळावर सुमारे ५० ते ६० झोपड्या बांधलेल्या आहेत. हातीवले-जैतापूर (अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणारा रस्ता) मार्गावर अगदी रस्त्याच्या कडेला डोंगर दत्तवाडी येथे उजव्या बाजूला पाहिलं की, तेथे दाटीवाटीने एकाला एक लागून उभ्या असलेल्या अनेक झोपड्या दिसतात. त्यातील काही पडलेल्या आहेत. लांबून पाहिलं तर येथे एखादी वस्ती असावी, असंच वाटतं. पण या सर्व झोपड्यांमध्ये सदासर्व काळ हा अवलिया एकटाच राहतो. जवळच्याच दत्तवाडी येथे त्यांचे घर आहे. तेथे सर्व नातेवाईक राहात असले तरी सुमारे २० वर्षांपूर्वी मुंबईहून गावाकडे आलेला हा माणूस या माळरानावर झोपडी बांधून एकटाच राहतोय.या उघड्या माळरानावर स्वत:पुरती एकच झोपडी न बांधता जोगले तेथे सातत्याने झोपड्या बांधण्याचा छंद जोपासत आहेत. झोपड्यांची उभारणी करण्यासाठी जोगले कसल्याही हत्यारांचा वापर करत नाहीत किंवा इतर कोणाला मदतीलाही घेत नाहीत.
एकट्यानेच ते झोपडी उभारतात. झोपडी बांधण्यासाठी हत्यारंही काय तर मूठ नसलेला एक कोयता! बस, एवढंच! पावसाळा संपल्यानंतर जोगले झोपडी बांधण्याची तयारी करतात. याच माळरानावर वाढलेले गवत ते स्वत: काढतात. जंगलातल्या झाडांच्या फांद्या व पाने गोळा करतात. त्यांनी बांधलेली झोपडी पाहिली की ‘इको-फ्रेंडली झोपडी’ काय असते, याचा प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही.
झोपडीची उभारणी करताना कोठेही दोरीचा वापर केला जात नाही. वेली आणि काही बांबूचा वापर ते करतात. जोगलेंनी उभारलेल्या या झोपडीचा पाया म्हणजेच जोता सुमारे चार ते पाच फूट उंच असतो. हा जोता उभारण्यासाठी लागणारे मोठाले दगडही हा अवलिया केवळ एका बांबूच्या सहाय्याने एकट्यानेच आणतो. त्या जोत्यामध्ये माती टाकण्यासाठीही कोणतेही हत्यार वापरले जात नाही. या झोपड्या आपण कशासाठी बांधतोय, त्याचे कारण सांगण्याचे जोगले आर्वजून टाळतात.
खरे म्हणजे ते बोलण्याचेच टाळतात. माणसांचा घोळका आला की, ते दूर पळतात. फक्त झोपड्या बांधत राहाणे एवढा एकच छंद. जवळच्याच दत्तवाडी येथे याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, हा माणूस गेल्या वीस वर्षांपासून येथे झोपड्या बांधण्याचे काम करतोय, असे लोक सांगतात. ते कुणाकडूनही काहीही घेत नाहीत. भीक मागणे त्यांच्या रक्तात नाही. केवळ आपल्या नातेवाईकांकडे जाऊन पोटापुरते अन्न मागून आणतात, इतर कोणाकडून ते काहीही घेत नाहीत.
सकाळी उठल्यापासून केवळ झोपडी बांधण्याचे काम करत राहायचे. ऊन वर आले की, एखाद्या झोपडीत आराम करायचा आणि ऊन जरा कमी झाल्यानंतर पुन्हा आपल्या कामाला लागायचे. काहीजणांना ते वेडसर वाटतात. पण, त्यांच्याशी बोलल्यानंतर ते धडधाकटच जाणवतात. मग हा माणूस झोपड्या का बांधतो, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो.
एकाकी जीवन : वारा, वादळातही झोपड्या जागेवर
कोणी कधीही या...!
‘जाता तया महाला, मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या’ या उक्तीप्रमाणे जोगले यांच्या झोपडीत कोणीही कधीही जाऊ शकते. केवळ एक ते दोन माणसे या झोपडीत राहू शकतात. बाहेर कितीही उष्णता असली तरी या झोपडीत मात्र फारच गारवा असतो. त्यामुळे येथून निघताना हा माणूस खरंच आपल्यापुरते राजाचे जीवन जगत असल्याचा हेवा वाटल्याशिवाय राहात नाही. संत तुकडोजी महाराजांच्या भाषेतच सांगायचे झाल्यास,
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे,
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या !
अनेक वर्षांपासून आम्ही येथील पायवाटेने आमच्या बागेत ये-जा करत असतो. हा माणूस सातत्याने येथे झोपड्या बांधण्याचे काम करताना दिसतो. या झोपड्या ते का आणि कोणासाठी बांधत आहेत, हे विचारण्याचा प्रयत्न आम्ही केला. मात्र, गेल्या अनेक वर्षात ते आम्हाला याचे उत्तर देण्याचे टाळत आहेत. बाकी ते आमच्याशी व्यवस्थित बोलतात. त्यांचे हे असे एकाकी जगणे बघून आम्ही त्यांना काही देऊ केले तरी ते घेत नाहीत. पण त्यांचे झोपड्या बांधण्याचे तंत्र अतिशय वेगळे आहे. या भागात सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक घरांची छपरे उडालेली आम्ही पाहिली आहेत. मात्र, सोसाट्याचा वारा असला अगर वादळ आले तरी जोगलेंची झोपडी पडलेली नाही.
- आनंद व धनंजय मराठे
बागायतदार, राजापूर.
छंदापायी झोपड्या
सामान्यपणे जीवन जगणाऱ्या माणसाला कधी कसला छंद जडेल हे सांगणे कठीण असते. त्या छंदापायी तो वेडा होऊन जातो. पण, या छंदातून एकामागोमाग सुंदर झोपड्या उभ्या राहू शकतात, याची कल्पनाच कोणी करू शकत नाही. या माळरानावरील झोपड्या याची साक्ष आहेत.