विकासनिधीवर फक्त जनतेचाच अधिकार -विनायक राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 06:38 PM2018-04-16T18:38:44+5:302018-04-16T18:38:44+5:30
वैभववाडी : रस्ते, पाणी याशिवाय आवश्यक पायाभूत सुविधा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे. विकासनिधी जनतेचा असून या निधीवर सर्वस्वी जनतेचाच अधिकार असतो.
वैभववाडी : रस्ते, पाणी याशिवाय आवश्यक पायाभूत सुविधा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे. विकासनिधी जनतेचा असून या निधीवर सर्वस्वी जनतेचाच अधिकार असतो. त्यामुळे जनतेला अपेक्षित कामेच या निधीतून झाली पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे लोकोपयोगी कामांची निवड करून ती पूर्ण करण्याला प्राधान्य देत आहोत, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी खांबाळे येथे केले.
खांबाळे येथील श्री देवी आदिष्टी मंदिर परिसरात खासदार निधीतून उभारलेल्या हायमास्टचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कणकवली विधानसभाप्रमुख शैलेश भोगले, नागेंद्र परब, तालुकाप्रमुख मंगेश लोके, रमेश तावडे, नगरसेवक संतोष पवार, रोहन रावराणे, सरपंच संचिता गुरव, उपसरपंच लवू साळुंखे, बबन पवार, सूर्याजी पवार, सुनील पवार, शांताराम कदम, अशोक पवार, संजय साळुंखे, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले की, विकासनिधीवर फक्त जनतेचाच हक्क असतो. त्यामुळे तुम्ही फक्त विकासकामे सूचवा. ती मार्गी लावण्याचे काम आमचे आहे. तळागाळापर्यंत विकास पोहोचविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. येथील शेतकºयांच्या आंबा, काजूला चांगला दर मिळाला पाहिजे. काजूला चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी काजू बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. काजू बोर्डाला निधी मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले की, शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अधिकाधिक समस्या मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा विकासाकरीता आणला
आहे. त्यामुळे जिल्ह्यात विकासाला गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शैलेश भोगले यांनी मनोगत व्यक्त केले. श्री आदिष्टी देवी देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष बबन पाटील यांच्या हस्ते खासदार राऊत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
ऊस संशोधन केंद्रासाठी प्रयत्नशील!
वैभववाडी तालुक्यातील शेतकरी ऊस शेतीकडे वळला आहे. तालुक्यात ऊस कारखाना झाला असता तर ऊसाचे क्षेत्र आणखी वाढले असते. परंतु दोघांच्या भांडणामुळे कारखाना होऊ शकला नाही. ऊसशेतीची शास्त्रीय माहिती मिळावी या हेतूने ऊस संशोधन केंद्र होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
खांबाळे येथील श्री आदिष्टी देवी मंदिराच्या आवारात बसविण्यात आलेल्या हायमास्टच्या उद्घाटनानंतर खासदार विनायक राऊत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.