केवळ दहावीसाठी होणार पुनर्परीक्षा
By admin | Published: June 12, 2015 11:34 PM2015-06-12T23:34:11+5:302015-06-13T00:18:13+5:30
नवा निर्णय : केवळ दहावीसाठी होणार पुनर्परीक्षा
सागर पाटील - टेंभ्ये -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या पुनर्परीक्षेचा कोकण विभागातील मार्च २०१५ परीक्षेत अनुत्तीर्ण १४०० तसेच ३५२ रिपीटर विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नसल्याचे कोकण विभागीय शिक्षण मंडळातून सांगण्यात आले.
मार्च २०१५मध्ये कोकण विभागातून दहावीच्या परीक्षेला ३९,७८७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ३८,४०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयात १२२४, विज्ञानमध्ये १२२३, इंग्रजी (२/३) मध्ये ७७९, सामान्य गणितमध्ये ७३०, मराठी (प्रथम) मध्ये ७२५, हिंदीमध्ये ६८७, तर समाजशास्त्र विषयात ६२४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे २१ जुलैपासून या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पुरवणी परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना दि. १५ जूनपासून आॅनलाईन आवेदनपत्र सादर करता येणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना आपल्या पूर्वीच्या शाळेतून आवेदनपत्र भरता येणार आहेत. नियमीत शुल्कासह आवेदनपत्र भरण्याची अंतिम तारीख २३ जून आहे. २६ जूनपर्यंत विलंब शुल्कासह आवेदनपत्र भरता येणार आहेत.
या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. विद्यार्थीसंख्येच्या प्रमाणात परीक्षा केेंद्र निर्माण करण्यात येणार आहेत.
मार्च २०१५च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबरोबर यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनादेखील या परीक्षेचा फायदा होणार आहे. यावर्षी केवळ दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा मात्र पूर्वीप्रमाणेच आॅक्टोबर २०१५ मध्ये घेण्यात येणार आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेच्या अंमलबजावणीच्या यशापयशाचा विचार करुन मार्च २०१६ नंतर इयत्ता दहावी व बारावी या दोन्ही वर्गाची पुरवणी परीक्षा घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर्षी दहावीची आॅक्टोबरची परीक्षा घेण्यात येणार नाही असे बोर्ड$िातर्पे सांगण्यात येत आहे.
शासनाने पुरवणी परीक्षेचा अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्याला नियमीत विद्यार्थ्यांप्रमाणे इयत्ता अकरावीला प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे सर्वच पात्र विद्यार्थ्यानी या संधीचा फायदा घ्यावा. प्रायोगिक तत्त्वावर यावर्षी दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत उपयुक्त आहे.
- आर. बी. गिरी,
अध्यक्ष, कोकण विभागीय मंडळ.