खंडाळ्यातील सोनालीच्या हातांमध्ये अवघ्या महाराष्ट्राची धुरा

By admin | Published: January 20, 2016 11:53 PM2016-01-20T23:53:38+5:302016-01-21T00:23:09+5:30

महाविद्यालयाच्या क्रिकेट संघात तिची निवड करण्यात आली. क्रिकेटची आवड असल्यामुळे वर्षभरात तिने चमकदार कामगिरी केली.

Only the sparrow of Maharashtra, in the hands of Sonali in Khandala | खंडाळ्यातील सोनालीच्या हातांमध्ये अवघ्या महाराष्ट्राची धुरा

खंडाळ्यातील सोनालीच्या हातांमध्ये अवघ्या महाराष्ट्राची धुरा

Next

मेहरून नाकाडे -- रत्नागिरी  -पायाला पॅड बांधून एका हातात बॅट आणि दुसऱ्या हाताने डोक्यावरील हेल्मेट सावरत जेव्हा प्रचंड आत्मविश्वासाने सोनाली मैदानावर उतरते ती स्पर्धक संघाला नमवण्याचा पण करूनच! ग्रामीण भागातील खेळाडूपुढे विजय संपादन करणे हाच मुळी उद्देश आहे, त्यापैकीच एक म्हणजे सोनाली जाधव. जांभारी (ता. रत्नागिरी) येथील सोनालीने दहावीनंतर गतवर्षी खंडाळा येथील पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयाच्या क्रिकेट संघात तिची निवड करण्यात आली. क्रिकेटची आवड असल्यामुळे वर्षभरात तिने चमकदार कामगिरी केली. सध्या बारावीत शिकत असलेली सोनाली जाधव १९ वर्षे वयोगटात महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे.सोनालीचे वडील हयात नाहीत, आई मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत आहे. स्वत: अल्प शिक्षित असल्या तरी मुलीने शिकावं, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे सोनालीला त्या सतत प्रोत्साहन देत आहेत. शाळेचे क्रीडाशिक्षक राजेश जाधव व अर्चना खानविलकर यांनी सोनालीची क्रीडा संघासाठी निवड केली. सोनाली जांभारीतून कॉलेजला खंडाळ्यात येते. कॉलेजपूर्वी व कॉलेज सुटल्यावर सोनाली न चुकता सरावासाठी मैदानावर हजर असते. चपळ क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट फलंदाजी आणि अचूक गोलंदाजी ही सोनालीची खासियत आहे. त्यामुळेच तिला आॅल राऊंडर असेही संबोधले जाते. तिच्या खेळातील स्पार्कमुळे मध्यप्रदेश येथील सटाणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या कर्णधारपदी सोनालीची नियुक्ती करण्यात आली.
महावि-द्यालयीन संघातून सोनाली सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाली व महाविद्यालयाला विजय मिळवून दिला. परभणी येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही महाविद्यालयाच्या संघाने विजय खेचून आणला. चंदीगड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही सोनाली सहभागी झाली होती. मध्यप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेचे कर्णधारपद सोनालीने भूषविले. तेथे विजय मिळाला नाही, चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे संघाला नमवून विजय प्राप्त केला. या स्पर्धेत सोनाली ‘वुमन आॅफ दी मॅच’ ठरली. त्याचबरोबर मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही तिला ‘वुमन आॅफ दी मॅच’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सोनाली दहावीपर्यंत शाळेच्या व्हॉलिबॉल संघातून खेळत होती. व्हॉलिबॉलही तिचा आवडीचा खेळ आहे. परंतु अकरावीपासून ती क्रिकेटकडे वळली. शैक्षणिक गुणवत्ता संपादन करून पुढे क्रिकेटमध्ये करियर करण्याचा विचार आहे. त्यासाठी सोनालीने पुढील शिक्षणासाठी मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सोनालीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मात्र, कॉलेजने तिच्याबरोबर संघातील अन्य खेळाडंूना खेळासाठी खास गणवेश उपलब्ध करून दिले आहेत. कसून केलेला सराव आणि जिद्द, चिकाटी यामुळे सोनालीच्या हातात महाराष्ट्राचा संघ आहे.


घरातून येताना आईने करून दिलेला भाजीपोळीचा डबा हाच तिचा ‘आहार’! सर प्रत्यक्ष ग्राऊंडवर त्यांचा सराव करून घेतात, त्यावेळी प्रत्येक टीप्स महत्त्वाच्या असतात व त्या स्पर्धेवेळी उपयोगी पडतात, असे सोनालीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.


क्रिकेट हा तर पुरुषांचा खेळ. असे म्हणणाऱ्या लोकांना सोनालीने आपल्या खेळाने मोहिनी घातली आहे. क्रिकेटच्या मैदानावर चालणाऱ्या तिच्या हालचाली, क्षेत्ररक्षण, फलंदाजी यामुळे सोनाली एवढ्या लहान वयातच महाराष्ट्र संघाच्या मुलींच्या संघाची कप्तान बनली.


कसून सराव, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि जिद्द यामुळेच आपली एवढी प्रगती झाल्याचे सोनाली सांगते. आपल्यावर महाराष्ट्र संघाची जबाबदारी आली आहे आणि ती पेलण्याची ताकदही, असे सोनाली सांगते.

Web Title: Only the sparrow of Maharashtra, in the hands of Sonali in Khandala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.