.... तरच विश्वात्मक महात्मा गांधींचे महत्व समजेल : श्रीपाल सबनीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 02:09 PM2019-11-05T14:09:48+5:302019-11-05T14:13:07+5:30
कोकणच्या गांधींची महती जर खऱ्या अर्थाने कोकणातील बांधवांमध्ये पोहोचली तरच विश्वात्मक अशा महात्मा गांधींचे महत्व या कोकणातील जनतेला समजू शकेल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
कणकवली : अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते. हा एकप्रकारे कोकणला मिळालेला बहुमान आहे. अप्पासाहेबांनी महात्मा गांधींचे विचार आत्मसात केले. त्याप्रमाणे कृतीही केली. त्यामुळे त्यांचे नाव सर्वदूर पोहचले. या कोकणच्या गांधींची महती जर खऱ्या अर्थाने कोकणातील बांधवांमध्ये पोहोचली तरच विश्वात्मक अशा महात्मा गांधींचे महत्व या कोकणातील जनतेला समजू शकेल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवानिमित्त वागदे येथील गोपुरी आश्रमाच्यावतीने बहुउद्देशीय सभागृहात सोमवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, जयवंत मठकर, ठाकूर, सुचिता कोरगावकर, अर्पिता मुंबरकर, रोहिदास धुसर, मंगेश नेवगी , हरिहर वाटवे, आबा कांबळे , ललिता सबनीस, अमोल भोगले , रवींद्र मुसळे, शिवचरण, प्रा. दिलीप गरुड , मोहन सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीपाल सबनीस म्हणाले, बॅरिस्टर असलेल्या मोहनदास करमचंद गांधींनी ज्यावेळी हातात झाडू घेतला. तेव्हा ते महात्मा गांधी झाले. दुसऱ्या धर्मात काय चांगले आहे? हे समजून घेतले तर आपल्याला महात्मा गांधी समजतील. ते शोषण मुक्तीचा संदेश देत होते. त्यांचा हा संदेश अप्पासाहेब पटवर्धन यांनीही सर्वदूर पोहचवला. हरिजन , भंगी अशा समाजातील विविध घटकांच्या उद्धाराचा प्रयत्न अप्पांनी केला. त्यांचे कृषी तसेच अन्य क्षेत्रातील प्रयोग समजून घ्यावे लागतील. मनातील आणि जनातील स्वच्छता करणारा सच्चा कार्यकर्ता त्यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतो.
गांधीवाद हा सर्व धर्माचे तत्व मानतो. अस्पृश्यता हा हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे. असे महात्मा गांधी सांगत असत. विनाकारण अर्धवट माहितीच्या आधारावर देशाच्या फाळणीला जबाबदार धरून काही लोक महात्मा गांधींचा द्वेष करीत असतील तर ते मोठे दुर्दैव आहे. महात्मा गांधी , बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान एकच आहे. विकासाच्या संकल्पनाही जवळजवळ एकच आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. देशात गांधी , आंबेडकर ,सावरकर यांच्या विचारावरून अलीकडे वाद घातले जातात. ते वाद संपले पाहिजेत. संकुचित मनातून सुरू झालेले हे वाद व्यापक मनातून विचार करून संपविले पाहिजेत.
काही लोकांना महात्मा गांधी मेल्यावर देखील पचवता येत नाहीत. त्यामुळे ते त्यांच्यावर विखारी शब्दात टीका करतात. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करतात. अपुऱ्या माहितीच्या आधारावर त्यांचे हे कृत्य सुरू असते. त्यातून आपले अज्ञानच ते प्रगट करीत असतात. मात्र, याउलट अप्पासाहेब पटवर्धनांनी गांधी, टिळक, सावरकर या सर्वांच्या भूमिका समजून घेतल्या आणि आपले समाजसेवेचे कार्य सुरूच ठेवले. आपणही अप्पांसारखी सर्वसमावेशक भूमिका घेणे आवश्यक आहे. कोकण प्रांताला अप्पासाहेब पटवर्धनांसारखा नायक मिळाला तसा जर सर्व प्रांतांना मिळाला तर देश नक्कीच प्रगतीपथावर जाईल. असेही श्रीपाल सबनीस यावेळी म्हणाले.
प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर म्हणाले, अप्पासाहेबांचे जीवन कृतिशील होते. त्यांचे विचार सर्वत्र पोहचविण्यासाठी गोपुरीतर्फे संवाद यात्रा सुरू करण्यात येणार आहे.अप्पासाहेबांनी इथे आर्थिक सक्षमता कशी येईल याचा नेहमी विचार केला.श्रीपाल सबनीस यांच्या सारखी मोठी साहित्यिक व्यक्ती या कार्यक्रमाला आली ही महत्वाची बाब आहे.या निमित्ताने आयोजित केलेल्या निबंध व रांगोळी स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.गोपुरीचे काम सतत चालू आहे.ते या पुढेही जोमाने चालू राहणार आहे.
यावेळी रोहिदास धुसर म्हणाले, अप्पासाहेब पटवर्धन यांच्या विचारामुळेच मी घडलो आणि पोलीस अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली. मी गुरे राखणारा होतो, पण अप्पांच्या विचाराने मी प्रभावित झालो आणि मोठा झालो.त्यामुळे त्यांच्यावर मी हा ग्रंथ लिहू शकलो.ते अनेक संकटातून पुढे गेले.त्यामुळे त्यांच्या हातून मोठे काम उभे राहू शकले.
रोहिदास धुसर यांच्या 'बहुजनांचे देवदूत - अप्पासाहेब पटवर्धन ' या ग्रंथाचे प्रकाशन श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. तसेच स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. अन्य मान्यवरानीही मनोगत व्यक्त केले.
फोटो ओळ -- वागदे येथील गोपुरी आश्रम परिसरातील अप्पासाहेब पटवर्धनांच्या पुतळ्याला श्रीपाल सबनीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर दुसऱ्या छायाचित्रात श्रीपाल सबनीस यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. राजेंद्र मुंबरकर, जयवंत मठकर, ठाकूर, सुचिता कोरगावकर, रोहिदास धुसर, मंगेश नेवगी आदी उपस्थित होते.