शेट्ये-सामंत यांच्यातच खरी लढत
By admin | Published: January 3, 2016 11:44 PM2016-01-03T23:44:40+5:302016-01-04T00:29:46+5:30
रत्नागिरी पालिका पोटनिवडणूक : तिन्ही पक्षांकडून विजयाचा दावा
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग २ (अ)मध्ये १० जानेवारीला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला अधिकच गती आली आहे. शिवसेनेतर्फे आमदार उदय सामंत, भाजपतर्फे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर हे घराघरात जाऊन प्रचार करीत आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक उमेश शेट्ये हेसुध्दा केतन शेट्ये यांचा जोरदार प्रचार करीत आहेत. सेना, भाजप व राष्ट्रवादी या तीनही पक्षांकडून आपलाच उमेदवार जिंकणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, मतदारराजा कोणाला साथ देणार, हे येत्या १० जानेवारीलाच स्पष्ट होणार आहे.
रत्नागिरीतील एका जागेसाठी होणारी ही पोटनिवडणूक शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची बनवली आहे. सेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादीत दाखल झालेल्या उमेश शेट्ये यांचे २०१६ मध्ये होणाऱ्या रत्नागिरी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न असल्याने त्यांना या पोटनिवडणुकीतच धोबीपछाड देण्याचे जोरदार प्रयत्न सेना आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली रत्नागिरीत सुरू आहेत. त्यामुळेच आमदार सामंत हे स्वत: निवडणूक प्रचारात उतरले आहेत.
वर्षभर उरलेल्या सत्ताकाळात पालिकेवर अधिक नगरसेवकांचे बळ प्राप्त करून वर्चस्व ठेवण्याचा चंग सेनेने बांधला आहे, तर सेनेचे हे प्रयत्न उधळून लावण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेश शेट्ये यांनी डावपेच आखले आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर उमेश शेट्ये यांच्यावर २०१६च्या पालिका निवडणुकीची जबाबदारी पक्ष सोपविणार असल्याचे सांगितले आहे. तसेच २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत उमेश शेट्ये यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीही दिली जाणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे राजकीय कारणांवरून सेना-राष्ट्रवादीत घमासान सुरू झाले आहे. (प्रतिनिधी)
भाजपचेही तगडे आव्हान
सेना-राष्ट्रवादीत जोरदार घमासान सुरू असतानाच भाजपनेही उमेश कुळकर्णी यांच्या रुपाने चांगला चेहरा जनतेसमोर आणला आहे. भाजप - सेनेची युती नसली तरी शहरात भाजपचा असा मतदारवर्ग आहे. त्यामुळे भाजपने नियोजनबध्द प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीतील लढत ही तिरंगी बनली आहे. सेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भाजपनेही तगडे आव्हान निर्माण केले आहे.