नितेश राणेंना मंत्रीपद मिळणार? भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 08:10 PM2022-07-05T20:10:40+5:302022-07-05T20:11:12+5:30
शरद पवार जे म्हणतात, ते कधीच होत नाही.
कणकवली : महाराष्ट्रात आता बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीचे सरकार आले आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचाराचे असल्याने विकासाच्या गाडीला आता डबल इंजिन लागलेले आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग होईल. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याशी चांगला संवाद आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या मंत्रीपदाबद्दल तेच सांगू शकतील असे मत भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केलं. तर, सिंधुदुर्गचा पालकमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच ठरवतील असेही त्यांनी सांगितले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना शेलार यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
आशिष शेलार हे आज, सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता त्यांनी कणकवली येथे भाजप पदाधिकाऱ्यांसोबत लोकसभा मतदार संघाबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
आशिष शेलार म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जागा जिंकण्यासाठी आतापासूनच पायाभरणी आढावा बैठकीच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. हा मतदार संघ भाजपला मिळविण्यासाठी नव्हे तर तो जिंकण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. असेही ते यावेळी म्हणाले. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल ? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, त्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच उत्तर देतील असेही ते म्हणाले.
पवार म्हणतात ते कधीच होत नाही
बाळासाहेब ठाकरे शिवसेना व भाजपाची युती झालेली आहे. हे सरकार स्थिर असून बहुमत सिद्ध केलेले आहे. त्यामुळे शरद पवार जे म्हणतात, ते कधीच होत नाही. कारण महाविकास आघाडी सरकार पुढील २५ वर्षे राहणार असेही ते म्हणाले होते. आता त्याचे काय झाले? बाळासाहेब ठाकरे शिवसेना व भाजप यांची दिलजमाई झाली आहे. त्यामुळे कोणाला मंत्री किंवा पालकमंत्री बनवा अगर नको बनवू, विशेष असे काहीही होणार नाही. मात्र,आम्ही केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाच्या गाडीला डबल इंजिन लावून जनतेला निश्चितच दिलासा देऊ. असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला.
ठाकरेंचा अहंकार प्रत्येक प्रकल्पाच्या आडवा येत होता
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाने पालकमंत्री मराठा समाजाचा द्यावा, अशी मागणी केली आहे. ती व मराठा समाजाच्या अन्य मागण्या महाविकास आघाडी सरकार पेक्षा भाजपच पूर्ण करेल. यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अहंकार प्रत्येक प्रकल्पाच्या आडवा येत होत. पण, आता डबल इंजिनच्या गतीने राज्यातील महामार्ग चौपदरीकरण तसेच अन्य प्रकल्प मार्गी लावले जातील असेही सांगितले.