दोडामार्ग, वैभववाडी आणि वेंगुर्लासाठी खुले आरक्षण

By Admin | Published: March 7, 2017 05:40 PM2017-03-07T17:40:06+5:302017-03-07T17:42:16+5:30

सभापतीपदांचे आरक्षण जाहीर : वैभववाडीबाबत औत्सुक्य, कुडाळमध्ये राजन जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Open reservation for Dodamarg, Vaibhavwadi and Vengurla | दोडामार्ग, वैभववाडी आणि वेंगुर्लासाठी खुले आरक्षण

दोडामार्ग, वैभववाडी आणि वेंगुर्लासाठी खुले आरक्षण

googlenewsNext

दोडामार्ग, वैभववाडी आणि वेंगुर्लासाठी खुले आरक्षण
सभापतीपदांचे आरक्षण जाहीर : वैभववाडीबाबत औत्सुक्य, कुडाळमध्ये राजन जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब
सिंधुदुर्गनगरी : बरेच दिवस प्रतिक्षा असलेले पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण अखेर मंगळवारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतखाली झालेल्या बैठकीत जाहीर झाले. दोडामार्ग, वैभववाडी आणि वेंगुर्ला या तालुक्यांचे सभापती पद खुले झाले असून कणकवली आणि देवगड ही सभापतीपदे सर्वसाधारण महिला प्रवगार्साठी राखीव झाले आहे. तर सावंतवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आणि मालवण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रवगार्साठी तर कुडाळ पंचायत समिती सभापती पद हे अनुसूचीत जाती प्रवगार्साठी आरक्षित झाले आहे. या पदावर शिवसेनेचे या प्रवर्गातील एकमेव उमेदवार राजन जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या (जुन्या) सभागृहात तालुका पंचायत समिती सभापती पदासाठीचे आरक्षण मंगळवारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सकाळी अकरा वाजता जाहीर करायला सुरुवात केली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण खाडे, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा परिषद् आणि पंचायत समिती निवडणुकांसाठीचे रणसंग्राम संपून दहा ते बारा दिवस होत आले तरी अद्याप पंचायत समित्यांच्या सभापती पदांची सोडत झालेली नसल्याने या पंचायत समित्यांवर सभापती म्हणून कोण बसणार या बाबत सर्वच पक्षात संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र मंगळवारी सभापती पदांसाठीचे आरक्षण काढल्यानंतर आता जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांमधील सभापती पदांचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र वैभववाडी तालुक्यातील पक्षीय स्थिती पाहता या ठिकाणी कोणत्या पक्षाचा सभापती बसणार याबाबत औत्सुक्य लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
आरक्षण पुढील प्रमाणे 
कुडाळ - अनुसूचित जाती प्रवगार्साठी राखीव, सावंतवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, मालवण - नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला, कणकवली व देवगड खुला प्रवर्ग महीला, आणि दोडामार्ग, वैभववाडी व वेंगुर्ला - खुला प्रवर्ग अशी आरक्षण जाहिर झाले आहे. हे आरक्षण काढताना लोकसंख्येचे प्रमाण, सलग एकच प्रकारचे आरक्षण, रोटेशन पध्दत आणि चिट्टी टाकून काढण्यात आले.
चिट्टिमुळे ओगलेंचा पत्ता कट
देवगड आणि दोडामार्ग या दोन पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षणे निश्चित करण्यासाठी चिट्टीचा वापर करावा लागला. या दोन तालुक्यांपैकी एक तालुका या चिट्टिवर खुला प्रवर्गातील महिलांसाठी राखीव व्हायचा होता. चिट्टी काढण्यासाठी पूर्ण प्राथमिक शाळा ओरोस बुद्रुकची विद्यार्थिर्नी अनुष्का नामदेव जांभवडेकर हिला बोलविण्यात आले. आणि तिने काढलेल्या चिट्ठीनुसार देवगड पंचायत समिति पद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आणि भाजपचे सभापती पदाच्या शर्यतीत असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले यांचा पत्ता कट झाला.
संभाव्य सभापती पदाचे दावेदार
आरक्षण आणि पंचायत समित्यांमध्ये असलेले पक्षीय बलाबल याचा विचार करता कुडाळ पंचायत समिती म्हणून शिवसेनेचे एकमेव अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार राजन जाधव यांचे नाव निश्चित झाले. सावंतवाडी सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण असे राखीव झाले असून या ठिकाणी काँग्रेसचा सभापती बसणार आहे. या पदासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि कलंबिस्त पंचायत समिती गणातून निवडून आलेले रवींद्र मडगावकर तसेच तळवडे गणातील पंकज पेडणेकर यांची नावे शर्यतीत राहणार आहेत. मालवण पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता असून हे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव झाले आहे. या ठिकाणी कोळंब गणातील सोनाली कोदे आणि कुंभारमाठ गणातील मनीषा वराडकर यांच्यापैकी एकाला संधी मिळणार आहे. दोडामार्ग तालुक्यात युतीची सत्ता राहण्याची शक्यता असून या ठिकाणी भाजपाचे झरेबांबर गणातील लक्ष्मण नाईक तसेच माटणे गणातील भरत जाधव यांची नावे शर्यतीत आहेत. देवगड पंचायत समितीतही युतीची सत्ता आहे. हे सभापती पद सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाल्याने या ठिकाणी भाजपाच्या पडेल गणातील पूर्वा तावड़े आणि किंजवडे गणातील प्राजक्ता घाडी यापैकी एकाला संधी मिळणार आहे. वेंगुर्ला पंचायत समितीवरही युतीची सत्ता असून या ठिकाणी शिवसेनेचे तुळस गणातील यशवंत परब आणि आसोली गणातून निवडून आलेले सुनील मोरजकर यापैकी एकाला संधी मिळणार आहे. कणकवली पंचायत समितीवर एकहाती काँग्रेसची सत्ता असून हे सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवगार्साठी राखीव झाले आहे. या प्रवर्गातून तब्बल सहा महिला उमेदवार असल्याने या ठिकाणच्या सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याची उत्सुकता अखेर पर्यंत राहणार आहे.

वैभववाडी अधांतरी
वैभववाडी पंचायत समितीसाठी एकुण सहा जागा असून यामध्ये कोंग्रेस 3, भाजपा 2 आणि शिवसेना 1 असे पक्षीय बलाबल आहे. या ठिकानचे सभापती पद हे खुले झाले आहे. या ठिकाणी शिवसेना आणि भाजपा या पक्षांनी एकत्र येत गट स्थापन केला आहे. मात्र कोंग्रेस किंव्हा युती यांना स्पष्ट बहुमत नसल्याने या ठिकाणी कोणत्या पक्षाचा सभापती बसतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. या ठिकाणी खुल्या प्रवगार्तून कॉंग्रेसचे उंबर्डे गणातील अरविंद रावराणे तर भाजपाचे लोर गणातून निवडून आलेले लक्ष्मण रावराणे हे दोन उमेदवार या पदासाठी दावेदार आहेत.

१४ ला होणार निश्चित
पंचायत समिती सभापती पदासाठी १४ मार्च तर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती पदांसाठी २१ मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. याच दिवशी सर्वच चित्र स्पष्ट होणार आहे.
 

Web Title: Open reservation for Dodamarg, Vaibhavwadi and Vengurla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.